Allegations of rotten grain scam in ration supply
पुणे: महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या खासगीकरणानंतर नागरिकांना किडलेले आणि निकृष्ट दर्जाचे धान्य पुरविले जात असल्याचा धक्कादायक आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.
ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे गोडाऊनमध्ये धान्य किडले जात असून, तेच धान्य सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून नागरिकांपर्यंत पोहचत आहे, असा गंभीर मुद्दा त्यांनी पत्रकार परिषदेत मांडला. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविल्याचे कुंभार यांनी सांगितले. (Latest Pune News)
कुंभार म्हणाले की, राज्यातील जवळपास 27 लाख मेट्रिक टन क्षमतेची वखारव्यवस्था तब्बल 120 कोटी रुपयांच्या करारातून खासगी कंपनीकडे सोपविण्यात आली. या करारामुळे धान्य साठवणुकीत गंभीर निष्काळजीपणा होत आहे. अपुरे मनुष्यबळ, नादुरुस्त वजन काटे, पिल्फरेज, सीसीटीव्ही सुरक्षेचा अभाव, यामुळे धान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या तपासणीत लोणंद आणि बारामती येथील वखारीत मोठ्या प्रमाणावर धान्य किडलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे धान्य नागरिकांना वाटप होत असून, त्यातील पोषणमूल्य नष्ट झाले आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाल्याचे कुंभार यांनी नमूद केले.
निष्काळजीपणा ठेकेदाराचा असतानाही जबाबदारी वखार महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर टाकली जात आहे. शासनाने खासगीकरणाला मनाई केली असतानाही निविदा काढून करार करण्यात आला. या कराराचा थेट फायदा ठेकेदार व खासगी कंपन्यांना झाला असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्यात आला आहे, असा आरोपही कुंभार यांनी केला आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
कुंभार यांनी या संपूर्ण खासगीकरण प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, किडलेले व निकृष्ट धान्य मागे घेऊन ते नष्ट करावे, नागरिकांना दर्जेदार धान्य पुरवावे, दोषी अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पुढे त्यांनी सांगितले की, खासगी कंपन्यांचे करार रद्द करून जबाबदारी शासनावर निश्चित करावी. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी पत्र पाठविले आहे.