

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 चा पोलिस उपनिरीक्षक पदाचा निकाल जाहीर केला आहे. यंदा या परीक्षेचा 'कट ऑफ' काही प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. ही परीक्षा 29 जून, 2025 रोजी घेण्यात आली होती आणि पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आणि कट ऑफ गुणांसह निकाल जाहीर करण्यात आला आहे. शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचे वेळापत्रक लवकरच एमपीएससीच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. निकालानुसार, उमेदवार शारीरिक चाचणी आणि मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांची यादी, त्यांचे सीट नंबर आणि कटऑफ गुण एमपीएससीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे शारीरिक चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे. शारीरिक चाचणीसाठी निवडलेले उमेदवार पात्रता निकषांच्या पडताळणीच्या अधीन असतील.
पोलिस उपनिरीक्षक पदासाठी कट ऑफ गुण वेगवेगळ्या श्रेणी आणि उपश्रेणीनुसार बदलतात. कटऑफ गुण हे आरक्षित प्रवर्गनिहाय तसेच खुल्या गटासाठी आणि अनाथ श्रेणींसाठी तसेच प्रत्येक श्रेणीतील जनरल, महिला आणि खेळाडू उपश्रेणीनुसार उपलब्ध आहेत. कटऑफ गुणांची माहिती एमपीएससीच्या संकेतस्थळावर तक्त्याच्या स्वरूपात दिली आहे. यामध्ये जनरल मुलांचे कट ऑफ गुण हे 292.50 तर मुलींचे कट ऑफ गुण 275.50 आहेत. तर ओबीसी मुलांसाठी 276 आणि मुलींसाठी 255.50 एवढे कट ऑफ गुण आहेत. यांसह अन्य प्रवर्गाचे कटऑफ देण्यात आले असून उमेदवारांना एमपीएससीच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.