

पुणे: राज्यात येत्या सोमवारपर्यंत पावसाची तीव्रता कमी असेल आणि त्यानंतर मात्र पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामानतज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी म्हटले आहे. यामुळे नवरात्रीत पावसाचा जोर वाढणार असल्याचे संकेत आहेत.
गेले दोन दिवस दुपारनंतर पावसाने धुमाकूळ घातला असून, 22 सप्टेंबरनंतर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. 26 सप्टेंबरपर्यंत बंगालच्या उपसागरात नवीन हवामान प्रणाली विकसित होणार असून, महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे, असे कश्यपी यांनी सांगितले. (Latest Pune News)
कोकण वगळता राज्यात अनेक भागांत पुढील दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पाऊस आणि धरणांतून होणारा विसर्ग, यामुळे अनेक भागांतील नद्या ओसंडून वाहत आहेत. शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.