बारामती: शहरात रस्त्यांची अवस्था इतर ठिकाणांपेक्षा चांगली असली तरी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीची यंत्रणा तितकीशी सक्षम नाही. शुक्रवारी (दि. 13) दुपारी झालेल्या पावसामुळे हे पुन्हा अधोरेखित झाले. शहरातील बहुतांश रस्ते हे जलमय झाले होते. शहरातील रस्त्यांवर पाणी साठून राहण्याचे प्रकार सातत्याने घडत असताना त्याबाबत कोणत्याच उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
मे अखेरीस झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील पाणी वाहून जाण्याची मर्यादा उघड झाली होती, परंतु त्यावेळी सलग चार दिवस जोरदार पाऊस पडत असल्याने हे घडले असावे, असा समज नागरिकांनी करून घेतला. (Latest Pune News)
आता पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे, परंतु मे महिन्यात आलेल्या अडचणींतून मार्ग काढण्याची तसदी प्रशासनाने घेतली नसल्याचे दिसून येते. पावसाचे पाणी तत्काळ वाहून जाईल अशा उपाययोजना तोकड्या असल्याचे वारंवार समोर येत आहे.
शुक्रवारी दुपारी झालेल्या पावसाने भिगवण सेवा रस्त्याला ठिकठिकाणी तळ्याचे स्वरूप आलेले पाहायला मिळाले. नगरपरिषदेसमोरील रस्त्यावर यापूर्वी हीच स्थिती अनुभवण्यास मिळत होतीख, परंतु पालिकेने येथील पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था उभी केल्याने तेथील प्रश्न आता संपला आहे.
परंतु माळावरची देवी परिसरातील जलतरण तलाव, अनेकान्त इंग्लिश मीडियम स्कूल, श्री छत्रपती शाहू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या परिसरातील रस्त्यांवर पावसाच्या पाण्यामुळे तळी साचत आहेत. याशिवाय निरा रस्त्यावर गुणवडी चौकातून थोडे पुढे गेल्यानंतर कर्हा नदीजवळील पुलाशेजारी सातत्याने पाणी साचून राहते आहे. हीच समस्या इंदापूर रस्त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून थोडे पुढे गेल्यानंतर अनुभवण्यास मिळत आहे.
सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज
पुढील तीन-चार महिने पावसाचे आहेत. या भागात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आत्ताच दक्षता घेऊन पावसाचे पाणी तत्काळ वाहून जाईल, अशी यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. अन्यथा गुडघाभर पाण्यातून दुचाकी नेताना नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.