

राजेंद्र खोमणे
नानगाव: मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे दौंड तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. पावसाने शेतात पाणी साचले, बाजारपेठा ओलांडणे कठीण झाले आणि शेतीसह मजुरीची कामे पूर्णतः ठप्प झाली. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणार्या कष्टकरी, मजूर वर्गाला बसला.
यामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कळीत झाली असताना निवडणुकीच्या काळात या वर्गाला डोक्यावर घेणारी नेतेमंडळी आता गायब झाली आहे. ही मंडळी कोठे लपून बसली असा प्रश्न आता कष्टकरी, मजूरवर्गाला पडला आहे. (Latest Pune News)
अवकाळी पावसानंतर काही काळ थांबलेली परिस्थिती सावरू लागली होती. बाजारपेठा पूर्ववत होत होत्या आणि शेतांमध्ये कामांना सुरुवात झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे पुन्हा कामे ठप्प झाली आहेत. परिणामी, गोरगरीब कुटुंबांवर पुन्हा आर्थिक संकट ओढावले आहे.
हीच ती वेळ आहे, जेव्हा निवडणुकीत गोरगरिबांना भेटवस्तू, पैसे, मटण, दारू किंवा किराणामालाच्या थैल्या देणारे नेते कुठे गायब झाले आहेत, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. निवडणुकीत दरवाजे ठोठावणारे, विचारपूस करणारे आणि चहापानाचे आमंत्रण देणारे हेच लोक सध्या कुठे लपले आहेत, यावर गावोगावी चर्चांना उधाण आले आहे.
पावसामुळे शेतीचे आणि मजुरीचे काम बंद असताना या कुटुंबांकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही. पैसे नसल्यामुळे किराणा भरता येत नाही, आणि पोट भरणे कठीण झाले आहे. निवडणूक काळात मतांसाठी झटणार्या नेत्यांनी आता या परिस्थितीतही लक्ष देण्याची गरज आहे, असा ठाम सूर आता सामान्य नागरिकांमधून उमटतो आहे.
सत्तेआधीच सेवा गरजेची
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. मतांसाठी पुढे सरसावणार्यांनी आत्ताच्या आर्थिक संकटात मदत करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
‘तेव्हा येतात, आता कुठे?’
निवडणूक काळात दरवाजे ठोठावणारे नेते आता गायब झाल्याची चर्चा गावकुसांवर, कट्ट्यांवर जोरात आहे. गोरगरिबांची विचारपूस होणार तरी कधी? असा प्रश्न आता गावकर्यांना पडू लागला आहे.