सासवड: मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत पुरंदर तालुक्यातील 305.7 हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले तसेच 33.40 हेक्टर क्षेत्रावरील फळपिके, 11.30 हेक्टरवरील कांदा, 33.20 हेक्टर क्षेत्रावरील फुलपिकांचेही नुकसान झाले आहे. तसेच 13 हेक्टर जमीन अतिवृष्टीने वाहून गेल्याने जमिनीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव यांनी दिली.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे दुष्काळी भागासह घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे नुकसान झाले. ज्या भागात पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले तेथे महसूल, कृषी व ग्रामविकास या तीनही यंत्रणांना या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश तहसीलदार विक्रम रजपूत यांनी दिले होते. त्यानुसार पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. (Latest Pune News)
पुरंदर तालुक्यात 15 मेनंतर पाऊस सुरू झाला, तर 20 मेनंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अंजीर, सीताफळ, कांदा तसेच विविध तरकारी आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकर्यांनी नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली होती.
तालुक्यातील 443.53 हेक्टरवरील विविध फळ आणि पिकांचे नुकसान झाले. यामुळे 1 हजार 505 शेतकरी बाधित झाले आहेत. नुकसान झालेल्या शेतकर्यांना तातडीने भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव यांनी दिली.
पिकांच्या नुकसानीचा तपशील
भाजीपाला पिके : 404.06 हेक्टर
फळपिके : 39.47 हेक्टर
कांदा : 11.30 हेक्टर
फुलपिके : 33.20 हेक्टर
वाहून गेलेली जमीन : 13 हेक्टर
पुरंदर तालुक्यात मे महिन्यामध्ये पावसामुळे शेतीचे नुकसान झाले होते. त्याचा पंचनामा महसूल कृषी व ग्रामविकास विभागाने करून अहवाल शासनास सादर केला आहे. यात एकूण 1505 शेतकर्यांचे 443 हे शेतीचे नुकसान झाले असून, त्यासाठी 77.57 लाख रुपये निधी मागणी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
- सुरज जाधव, कृषी अधिकारी, पुरंदर