पुणे

भोर शहरात रोडरोमियोंचा उपद्रव वाढला, कारवाईची मागणी; विद्यार्थिंनीसह पालकांची मागणी

अमृता चौगुले

भोर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: भोरच्या रस्त्यांवर, गल्लीबोळांत, शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर, एसटी बसस्थानक आदी ठिकाणी रोडरोमियोंचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे रोडरोमियोंवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थिंनींसह पालकांकडून करण्यात येत आहे.

सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थिनी भोर शहरात शिक्षणासाठी एसटी बस किंवा मिळेल त्या खासगी वाहनांनी येत आहेत. मात्र, या विद्यार्थिनींना रोडरोमियोंचा त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. शाळा, महाविद्यालय भरतेवेळी किंवा सुटल्यावर विद्यार्थींनींजवळून भरधाव वेगाने दुचाकी पळवणे, कर्णकर्श हॉर्न वाजवणे, शाळा-महाविद्यालयांबाहेर छेडछाड करणे, एसटी बसस्थानकापर्यंत पाठलाग करण्याचे प्रकार रोडरोमियोंकडून होऊ लागले आहेत. अनेकदा रोडरोमियोंच्या दोन गटांत हाणामारीचे प्रकारदेखील घडले आहेत. त्यामुळे विद्यार्थिंनींमध्ये शाळेत येता-जाताना असुरक्षितचेची भावना आहे. तर पालकांनादेखील मोठी चिंता लागलेली आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थिंनींना निर्भयपणे येता यावे. त्यांना त्रास होऊ नये म्हणून रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. शाळा, महाविद्यालय सुरू होताना व सुटताना या दोन्ही वेळी पोलिसांनी विशेष पथके तयार करून रोडरोमियांना चांगलाच धडा शिकवावा, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

मोबाईल चोरांच्या बंदोबस्ताची मागणी

भोर शहरात गेल्या काही महिन्यांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील तीन ते चार महिन्यांत शहरात दिवसाढवळ्या खूनही झाला आहे. अनेक गुन्ह्यांच्या तपासाला वेळ लागत आहे. ग्रामीण भागातही बेकायदेशीर व अवैध धंद्यांत वाढ झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मात्र, याकडे भोर पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या आठवडे बाजारात मोबाईल चोरणार्‍यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यासाठी आठवडे बाजारात साध्या वेषातील पोलिसांची नेमणूक करून मोबाईल चोरांना पकडावे, अशी मागणी शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक करीत आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT