भिगवण: कोट्यवधी रुपये खर्चून नव्याने उभारण्यात आलेल्या जुन्या भिगवण येथील पुलाला संरक्षक कठडे बसविण्याकडे ठेकेदाराने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने वाहने थेट पाण्यात पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशी घटना घडल्यास मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बारामती-भिगवण रस्त्यावरील पुलाचे धोके मात्र कायम आहेत.
बारामती एमआयडीसी ते खानवटे रस्त्याच्या कामात अनेक त्रुटी ठेवल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच मदनवाडी येथील व जुने भिगवण येथील धोकादायक वळणावरील अरुंद पूल अनेक अपघातांचे साक्षीदार आहेत. (Latest Pune News)
मदनवाडी येथील पुलाचे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात जीव मुठीत धरून पूल ओलांडावा लागतो. याच मार्गावर जुने भिगवण येथे अतिशय धोकादायक वळणावर जुना पूल होता. या पुलावरून देखील अंदाज न आलेली अनेक वाहने थेट पाण्यात पडून अपघात घडले आहेत. येथे नव्याने मोठा पूल उभारून तो रहदारीसाठी खुला करण्यात आला. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूला कठडेच बसविण्यात आले नाहीत.
जोरदार पावसामुळे सध्या उजनीचा पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. येत्या काही दिवसांत पुलाभोवती पाण्याचा वेढा पडणार आहे. या पुलावरून वाहने सुसाट वेगाने येतात. त्यामुळे अपघात घडल्यास वाहने थेट पाण्यात कोसळण्याची व मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संभाव्य धोका लक्षात घेऊन येथील संरक्षक कठडे त्वरित बसविण्याची मागणी होत आहे. तसेच मदनवाडी पुलाचे अर्धवट काम पूर्ण करणे गरजेचे आहे. रस्ते पूर्ण झाले असले तरी पुलाचे संरक्षक कठडे नसणे, साइडपट्ट्यांकडे दुर्लक्ष करणे आदी समस्या अपघाताला निमंत्रण देणार्या आहेत.