बारामती: रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची सेवा करण्याची स्थिती जिल्हा बँकेत दोनदा निर्माण झाली आहे. तुम्ही काय ते समजून जा, नेतृत्वाच्या सूचनेशिवाय हे होऊ शकत नाही, असे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी सांगितले. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 18) रात्री अकरानंतरही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बारामती येथील आमराई भागातील शाखा उघडी होती, त्यावर पवार यांनी आपल्या अंदाजात टोला लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळीही या बँकेची वेल्हे तालुक्यातील शाखा मध्यरात्री दोन वाजेपर्यंत सुरू होती, त्याचा संदर्भ पवार यांच्या या टोल्यात होता. चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनेलने बँक उघडी ठेवण्यावर आक्षेप घेतला. येथे ‘माळेगाव’च्या मतदार याद्या तसेच पैशाची पाकिटे भरली जात होती, असा आरोप केला. हे प्रकरण सध्या चौकशी समितीकडे आहे.(Latest Pune News)
पवार म्हणाले, यापूर्वी रात्री दोन वाजता बँक उघडलेली होती. हे दुसर्यांदा घडते आहे. बँक उघडी कशी राहू शकते? बँकेचे नेतृत्व करणारे जे लोक आहेत, त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी कशाला बँक उघडतील? रात्री बारा किंवा दोन वाजता लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेत दुसर्यांदा दिसतेय, याचा अर्थ काय समजायचा तो समजून घ्या!
जिल्हा बँकेने अद्यापही यावर कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही. खा. सुप्रिया सुळे यांनी आरबीआय व नाबार्डने याची दखल घ्यावी तसेच एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.
अजित पवार गप्पच
बुधवारी रात्रीपासून बारामतीत जिल्हा बँक शाखा उघडी असल्याचा मुद्दा चर्चेत आहे. त्यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. पण, तीन-चार दिवसांपासून बारामती दौर्यावर असलेल्या आणि विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयी चकार शब्दही काढला नाही. शुक्रवारीही (दि. 20) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. परंतु, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.