बारामती: वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटसह (व्हीएसआय) रयत शिक्षण संस्था व अन्य कार्यक्रमांत यापूर्वी एकत्र आलेले दोन्ही ज्येष्ठ नेते खा. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (दि. 20) बारामतीत मात्र दूर राहिले.
शरद पवार यांच्या उपस्थितीत विद्या प्रतिष्ठानमध्ये झालेला कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाळला. ते बारामतीतील अन्य कार्यक्रमांना उपस्थित राहिले. दरम्यान, याच कार्यक्रमात खा. सुप्रिया सुळे व खा. सुनेत्रा पवार यांचा मात्र संवाद झाला. (Latest Pune News)
येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये ‘एआय’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, खा. सुनेत्रा पवार यांची नावे कार्यक्रमपत्रिकेत होती. परंतु, या कार्यक्रमाला जाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाळले. त्याच वेळी ते बारामतीत शारदा प्रांगणात आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यानंतर ते माळेगावच्या सभेकडे वळाले.
पुणे, सातारा येथे संस्थांच्या बैठकांसाठी एरवी एकत्र येणार्या दोन्ही पवारांनी बारामतीत अंतर का राखले? असा प्रश्न निर्माण झाला आहे. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त गेल्या चार दिवसांपासून दोन्ही पवार बारामतीत आहेत.
विद्या प्रतिष्ठान संस्थेचे शरद पवार हे अध्यक्ष; तर अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार हे विश्वस्त आहेत. गुरुवारी शारदानगरला आयोजित ’एआय’ परिषदेलाही उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते.
शुक्रवारी विद्या प्रतिष्ठानमध्ये ते एकत्र येतील, अशी शक्यता होती. परंतु, अजित पवार यांनी या कार्यक्रमाला जाणे टाळले. ते का आले नाहीत? या प्रश्नावर खा. सुळे यांनी माझ्यापेक्षा तेच यावर उत्तर देऊ शकतात, अशी प्रतिक्रिया दिली.