आशिष देशमुख
पुणे: कामगारांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी कामांच्या तासांचे योग्य नियोजन करणे शक्य आहे. तसेच, दमट-उष्णतेचे अलर्ट देणे सहज शक्य आहे. तसे केले तर घटत चाललेली उत्पादकता वाढवणे शक्य आहे, असा उपाय हवामानशास्त्रज्ञांनी दिला आहे. वाढत्या उष्णतेमुळे १९८० ते २०२० या ७० वर्षांत जगाचे किती अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले असेल याचा अंदाजदेखील गणितीय आलेखातून मांडला आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, अभूतपूर्व दमट-उष्णतेमुळे कामांच्या तासांत घट होत आहे. मानवासाठी हा गंभीर धोका आहे. जास्त उष्णता, जास्त आर्द्रता, जास्त कामगार अशा वातावरणात कमी उत्पादकता आणि जास्त आरोग्य जोखीम, असे गणित तयार होत आहे.
मानवी आरोग्य जपले नाही, तर उपजीविका धोक्यात येईल, तसेच उत्पादकतेत घट आणि अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येऊ शकतो. अधिक उष्ण वातावरण म्हणजे मोठा धोका, मोठे नुकसान; पण वेळेत कृती केल्यास जोखीम कमी होते, असा निष्कर्ष त्यांनी संशोधनातून मांडला आहे.
शास्त्रज्ञांचे निष्कर्ष
१९८० च्या दशकापासून उष्णतेशी संबंधित कमांच्या तासांच्या नुकसानीतील चढ-उतार आणि अचानक होणाऱ्या वाढीची तीव्रता वाढत गेली.
१९८० नंतर जगात ८५ अब्ज व्यक्ती-तास (डब्ल्यू.बी.जी.टी.) आणि पुढील ७० वर्षांत (२०२० पर्यंत) ३४० अब्ज-व्यक्ती तास (ह्युमिडेक्स) या संभाव्य तासांचे नुकसान होण्याचा अंदाज गणितीय विश्लेषणाद्वारे दाखवला आहेत.
डब्ल्यू.बी.जी.टी. म्हणजे वेट बल्ब ग्लोब टेम्परेचर. यात उष्णता वारा आणि किरणोत्सर्ग यांचा शरीरावर एकत्रित होणारा परिणाम मोजणारे हे सूचकांक.
ह्युमिडेक्स म्हणजे तापमान आणि आर्द्रता यांच्या आधारे माणसाला जाणवणाऱ्या उष्णतेची तीव्रता दर्शवणारा निर्देशांक आहे.
१९५० ते २०२० या ७० वर्षांत वार्षिक संभाव्य कामाच्या तासांत दर दशकाला टप्प्याटप्प्याने घट होताना दिसत आहे.