Pudhari Rise Up 2026 Pudhari
पुणे

Pudhari Rise Up 2026: ‘राईज अप’ महिला राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धेला पुण्यात दिमाखात सुरुवात

‘पुढारी’ व महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने ३ लाख रुपयांच्या पारितोषिकांसह १६८ बक्षिसांची मेजवानी; महिलांसाठी मोफत प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुढारी वृत्तसेवा महिलांच्या बुद्धिबळ कौशल्याला वाव देण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी 'पुढारी' च्या वतीने महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या सहकायनि 'राईज अप' महिला राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचे उ‌द्घाटन साडेपाच वर्षांची बुद्धिबळपटू तनिष्का जैन आणि ज्येष्ठ बुद्धिबळपटू खेळाडू ज्योत्स्ना हापसे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे, दै. 'पुढारी'चे मार्केटिंग विभागप्रमुख संतोष धुमाळ, एन. डब्ल्यू, शामशेठ ज्वेलर्सचे संचालक नैनेश दहिवाडकर व तन्वी दहिवाडकर उपस्थित होते. ही स्पर्धा प्रामुख्याने चार गटांत विभागली गेली आहे. यामध्ये खुला गट, २० वर्षांखालील, १५ वर्षांखालील आणि १० वर्षांखालील, अशा वयोगटांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक गटात दिव्यांग आणि अंध खेळाडूंसाठी तसेच वयोगटानुसार (उदा. ८, १३, १८ वर्षांखालील आणि ५० वर्षांवरील महिला) स्वतंत्र उपविजेतेपद व रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी एकूण ३ लाख रुपयांची रोख पारितोषिके, मेडल्स, करंडक आणि प्रमाणपत्र, अशी एकूण १६८ बक्षिसे दिली जाणार आहेत.

ही स्पर्धा 'स्विस लीग' पद्धतीने खेळवण्यात आली आहे. प्रत्येक खेळाडूला १५ मिनिटे अधिक ५ सेकंद इंक्रिमेंट असा वेळ देण्यात आला असून, स्पर्धेत एकूण ७ फेऱ्या पार पडणार आहेत. सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्रे दिली जाणार असून, स्पर्धेमध्ये खेळाडूंना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर माणिकचंद ऑक्सिरिच असून, फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, अॅकॅडमिक पार्टनर सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट हे आहेत. सहप्रायोजक अदानी, तर असोसिएट पार्टनर व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज, के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स ट्रिनिटी, अमनोरा पार्क टाऊन, सपोर्टिंग पार्टनर पुणे महापालिका यांचे सहकार्य मिळाले आहे.

महाराष्ट्रातील सर्व महिला बुद्धिबळपटूंना 'राईज ऑफ वूमन-सीझन ४'मध्ये सहभागी होण्यासाठी हे मोठे व्यासपीठ दै. 'पुढारी' वृत्तपत्राने दिले आहे. हा एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. ही केवळ एक स्पर्धा नसून भारतीय बुद्धिबळातील महिलांच्या कौशल्याचा, मेहनतीचा आणि वाढत्या सामर्थ्याचा सोहळा आहे.
मृणालिनी कुंटे, महिला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मास्टर आणि शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू
दै. 'पुढारी'च्या वतीने सुरुवातीला जिल्हापातळीवर ही स्पर्धा सुरू केली. मात्र, दै. 'पुढारी' स्पर्धेत मोफत प्रवेश आणि उत्तम नियोजनामुळे ही स्पर्धा राज्यपातळीपर्यंत घेऊन जावी लागली. या स्पर्धेचे चौथे वर्ष असून, खेळाडूंकडून कोणतेही शुल्क न घेता त्यांना रोख पारितोषिकांसह करंडक आणि प्रमाणपत्रही दिले जाते. माध्यम समूहामध्ये ही एकमेव महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी मोठी स्पर्धा आहे.
राजेंद्र कोंडे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ
दै. 'पुढारी'च्या वतीने आयोजित स्पर्धेत खेळाडूंचा उत्साह खूप दिसून आला. अनेक स्पर्धा शहरात सुरू असतात. पण, केवळ महिलांसाठी आणि तेही मोफत प्रवेश असलेली ही एकमेव स्पर्धा आहे. खेळाडूंना क्रीडा स्पर्धेत तयार करून इथपर्यंत आणणाऱ्या पालकांचेही महत्त्व अधिक आहे.
नैनेश दहिवाडकर, संचालक, एन. डब्ल्यू. शामशेठ ज्वेलर्स

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT