पुणे: महिलांच्या बुद्धिबळ कौशल्याला वाव देण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी, 'पुढारी'च्या वतीने महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने 'राईज अप' महिला राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा रविवार, १५ फेब्रुवारी सकाळी ९ वाजता शिवशंकर हॉल, महर्षीनगर येथे होणार आहे. स्पर्धेसाठी एकूण ३ लाख रुपयांची रोख पारितोषिके, मेडल्स, करंडक आणि प्रमाणपत्र अशी एकूण १६८ बक्षिसे दिली जाणार आहेत.
ही स्पर्धा प्रामुख्याने चार गटांत होणार आहे. यामध्ये खुला गट, २० वर्षांखालील, १५ वर्षांखालील आणि १० वर्षांखालील अशा वयोगटांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक गटात दिव्यांग आणि अंध खेळाडूंसाठी, तसेच वयोगटानुसार (उदा. ८, १३, १८ वर्षांखालील आणि ५० वर्षांवरील महिला) स्वतंत्र उप-विजेतेपदे व रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर माणिकचंद ऑक्सिरिच असून, फायनान्स पार्टनर लोकमान्य मटिपर्पज को-ऑप. सोसायटी, अॅकेडमिक पार्टनर सूर्यदत्ता इन्स्टट्यूट हे आहेत. सहप्रायोजक अदानी, तर असोसिएट पार्टनर व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज, के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटस ट्रिनिटी, अमनोरा पार्क टाऊन, सपोर्टिंग पार्टनर पुणे महापालिका यांचे सहकार्य मिळाले आहे.
नाव नोंदणीची अंतिम मुदत १३ फेब्रुवारी
ही स्पर्धा 'स्विस लीग' पद्धतीने होणार आहे. प्रत्येक खेळाडूला १५ मिनिटे अधिक ५ सेकंद इन्क्रिमेंट असा वेळ दिला जाईल. स्पर्धेत एकूण ७ फेऱ्या होतील. सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्रे दिली जातील. या स्पर्धेत खेळाडूंना मोफत प्रवेश दिला जाणार असून, नाव नोंदणीची अंतिम मुदत १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत. अधिक माहितीसाठी स्पर्धेचे संचालक महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे ९८२२३०३५४० आणि मुख्य पंच आयए श्रद्धा विंचवेकर यांच्याशी ९९७५७४७००८ या क्रमांकावर संपर्क साधावा.