पुणे

Rise Up : श्रिनिका उमेकर, श्रेया गायकवाड यांना विजेतेपद

Laxman Dhenge

पुणे : दै. 'पुढारी'च्या वतीने आयोजित 'राईझ अप' पुणे महिला टेबल टेनिस जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये अकरा वर्षांखालील गटामध्ये श्रिनिका उमेकर हिने, तर तेरा वर्षांखालील गटात श्रेया गायकवाड हिने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
दै. 'पुढारी' आयोजित या स्पर्धेच्या दुसर्‍या हंगामाची सुरुवात झाली. या स्पर्धा पूना डिस्ट्रिक्ट टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने, तर सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटरच्या सहकार्याने पार पडल्या.

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोनी इंडियाच्या पुणे विभागाचे मार्केटिंग प्रमुख दीपक सुलाखे आणि श्रद्धा दीपक सुलाखे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दै. 'पुढारी'च्या मार्केटिंग विभागाचे नॅशनल हेड आनंद दत्ता, हरीश हिंगणे, असोसिएशनचे सेक्रेटरी मधुकर लोणारे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धा प्रभात रोड येथील सिंबायोसिस स्कूलच्या सिंबायोसिस स्पोर्ट्स सेंटर येथे झाल्या. अकरा वर्षांखालील गटाच्या उपांत्य लढतीत अहना गोडबोले आणि शरण्या पटवर्धन यांनी विजय मिळविला.

अंतिम सामन्यात श्रिनिका उमेकर हिने स्पृहा गुजर हिचा 11-14, 11-5, 11-8 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. तेरा वर्षांखालील गटाच्या उपांत्य लढतीत स्पृहा बोरगावकर आणि आद्या गावत्रे यांनी विजय मिळविला. अंतिम सामन्यात श्रेया गायकवाड हिने श्रिनिका उमेकर हिचा 11-7, 11-3, 11-9 असा पराभव करीत विजय मिळविला. पंधरा वर्षांखालील गटाच्या उपांत्य लढतीत वेदांगी जुमडे आणि आद्या गावत्रे यांनी विजय मिळविला, तर अंतिम सामन्यामध्ये तनया अभ्यंकर हिने पलक जेस्वानी हिचा 11-5, 11-10, 11-7, 11-3 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.

सतरा वर्षांखालील गटाच्या उपांत्य लढतीत वेदांगी जुमडे आणि आद्या गावत्रे यांनी विजय मिळविला. अंतिम सामन्यामध्ये जान्हवी फणसे हिने तनया अभ्यंकर हिचा 11-7, 11-9, 11-5, 11-10 असा पराभव करीत विजय मिळविला. एकोणीस वर्षांखालील गटामध्ये उपांत्य लढतीत जान्हवी फणसे आणि तनया अभ्यंकर यांनी विजय मिळविला. अंतिम सामन्यात धनश्री पवार हिने आद्या गावत्रे हिचा 11-7, 11-5, 11-9,11-7 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.

महिलांच्या उपांत्य लढतीमध्ये धनश्री पवार आणि सारिका वर्दे यांनी विजय मिळविला. अंतिम सामन्यामध्ये स्वप्नाली नराळे हिने जान्हवी फणसे हिचा 11-1, 11-5, 11-5 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. वेटर्नस गटाच्या उपांत्य लढतीमध्ये ज्योत्स्त्ना पटवर्धन आणि गायत्री दांडेकर यांनी विजय मिळविला. अंतिम सामन्यामध्ये सारिका वर्दे हिने विन्नी कारोळे हिचा 11-4, 11-4, 11-2 असा पराभव करीत विजय मिळविला.


दै. 'पुढारी'च्या वतीने पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड भागातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि खेळाचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने 'राईझ अप' पुणे महिला क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. मागील वर्षी सुरू झालेल्या फक्त महिलांसाठी राईझ अप या क्रीडा स्पर्धांच्या उपक्रमाच्या सिझन 2 ची सुरुवात या वर्षी सप्टेंबर महिन्यात बुद्धिबळ, कॅरम स्पर्धेने झाली होती. त्यानंतर महिलांच्या जिल्हास्तरीय कुस्ती, जलतरण आणि अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाही उत्साहात पार पडल्या. महाराष्ट्रात अशा प्रकारची केवळ महिलांसाठी स्पर्धा घेणारा दै. 'पुढारी' हा एकमेव माध्यम समूह आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नसून, मोफत प्रवेश देण्यात आला होता. या राईझ अप सिझन 2 साठी माणिकचंद ऑक्सिरिच हे मुख्य प्रायोजक असून, सहप्रायोजक म्हणून रुपमंत्रा, मीडिया प्रायोजक म्हणून झी टॉकीज, एज्युकेशन पार्टनर म्हणून सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, बँकिंग पार्टनर म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप सोसायटी आणि सपोर्टिंग पार्टनर म्हणून पुणे महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य मिळाले.

दै. 'पुढारी'चा स्तुत्य उपक्रम

दै. 'पुढारी' च्या वतीने केवळ महिलांसाठी अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. हा स्तुत्य उपक्रम आहे. महिला अथवा मुलींना क्रीडा क्षेत्रात मोठे व्यासपीठ मिळवून देणारे माध्यम क्षेत्रातील एकमेव दै. 'पुढारी' आहे. अशा स्पर्धांमधूनच आगामी काळात चांगले महिला खेळाडू राज्याला पर्यायाने देशाला मिळतील. दै. 'पुढारी' च्या या उपक्रमाला शुभेच्छा देताना यापुढे ही अशाच स्पर्धांचे आयोजन वारंवार करावे.

– दीपक सुलाखे (मार्केटिंग प्रमुख, सोनी इंडिया, पुणे विभाग.)

खेळाडूंना प्रोत्साहन

दै. 'पुढारी'च्या वतीने केवळ टेबल टेनिस नव्हे, तर इतर खेळांचे केवळ महिलांसाठी स्पर्धा आयोजित केली आहे. हा दै. 'पुढारी'चा स्तुत्य उपक्रम असून, अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे अनेक खेळाडूंना खेळण्याची संधी मिळत आहे. खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धा खेळायला मिळाले, तर नक्कीच त्यांची प्रगती होते.

– अस्मिता डुंबरे (प्रशिक्षक, डेक्कन जिमखाना)

स्पर्धेतून अनुभव मिळाला

दै. 'पुढारी'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या टेबल टेनिस स्पर्धेमध्ये या वर्षी प्रथमच सहभागी झाले. मात्र, या स्पर्धेतील माझा अनुभव चांगला आहे. माझ्या वयोगटात सहभागी झालेले खेळाडू ही त्याच तोडीचे होते. त्यामुळे स्पर्धा खेळण्याबरोबरच स्पर्धेचा आनंदही घेता आला.

– श्रिनिका उमेकर (टेबल टेनिसपटू)

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT