

सातारा; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील वडगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी सातार्यात चहासाठी थांबल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या गाडीतील 18 लाख 92 हजार 500 रुपयांची रोकड तसेच मोबाईल, कागदपत्रे असलेल्या दोन बॅगा लंपास केल्या. वाढेफाटा येेथे ही घटना घडली. हे शेतकरी बेळगाव येथे कांद्याची विक्री करून पुन्हा माघारी जात असताना ही घटना घडली. ही घटना दि. 3 डिसेंबर रोजी घडली असून, याप्रकरणी सतीश शंकर ढवळे (रा. वडगाव, ता. शिरुर, पुणे) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत माहिती अशी, सतीश ढवळे हे कांदा उत्पादक शेतकरी आहेत. दि. 2 डिसेंबर रोजी ते व त्यांचे इतर शेतकरी मित्र कांदा विकण्यासाठी पुण्याहून बेळगाव येथे वेगवेगळ्या टेम्पोमधून गेले होते. कांदा विक्री केल्यानंतर पुन्हा सतीश ढवळे व त्यांचे इतर सहकारी पुण्याकडे निघाले होते. ढवळे यांचे 12 लाख रुपये व त्यांचे मित्र नितीन बोत्रे यांचे 6 लाख 60 हजार रुपये अशी रक्कम त्यांनी त्यांच्या बॅगमध्ये घेवून ती बॅग चालकाच्या सीट पाठीमागे ठेवली होती. सातार्याजवळ ते रात्री वाढेफाटा येथे चहासाठी थांबले. त्यानंतर काही वेळाने ते पुन्हा पुण्याकडे गेले. गावी पोहोचल्यानंतर मात्र ढवळे व नितीन बोत्रे यांच्या बॅगा टेम्पोमध्ये नव्हत्या. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही पैसे सापडले नाहीत. यामुळे सातार्याजवळ थांबल्यानंतर पैशांची चोरी झाल्याची त्यांची खात्री झाल्याने त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.