मिझोराममध्ये ‘झेडपीएम’चा विजय

मिझोराममध्ये ‘झेडपीएम’चा विजय

ऐजवाल; वृत्तसंस्था : सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) पक्षाला धूळ चारत झोरम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) या पक्षाने मिझोराममध्ये एकतर्फी विजय मिळविला आहे. 40 जागांपैकी 27 जागांवर बाजी मारत झेडपीएमने निर्विवाद सत्ता मिळविली आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपला सत्ता मिळाली असून काँग्रेसला तेलंगणात विजय मिळाला आहे. पाच राज्यांपैकी रविवारी चार राज्यांचे निकाल जाहीर झाले होते. सोमवारी मिझोराममधील मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून झेडपीएमने आघाडी घेतली होती. मुख्यमंत्री जोरमथंगा यांच्यासह सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

जोरमथंगा यांचा दोन हजार मतांनी पराभव झाला आहे. भाजपने 23 जागांवर उमेदवार उभे केले होते. भाजपला यापैकी केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले असून काँग्रेसच्या खात्यात केवळ एक जागा आली आहे. सत्ताधारी एमएनएफचा (मिझो नॅशनल फ्रंट) दारुण पराभव झाला असून या पक्षाला 10 जागा मिळाल्या आहेत. निकालानंतर मुख्यमंत्री जोरमथंगा यांनी राज्यपाल डॉ. हरी बाबू कंभमपती यांच्याकडे राजीनामा दिला. झेडपीएमचे नेते आणि मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार लालदुहोमा यांनी सेरछिप मतदारसंघातून विजय मिळविला आहे.

मिझोराममध्ये 7 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले होते. 40 जागांसाठी 174 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. 8 लाख 57 हजारांवर (80 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

इंदिरा गांधी यांचे माजी सुरक्षा विभागप्रमुख होणार मुख्यमंत्री

पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतीय पोलिस दलात (आयपीएस) लालदुहोमा रुजू झाले होते. 30 वर्षांत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख म्हणून लालदुहोमा यांनी काम पाहिले आहे. 1984 साली त्यांनी पोलिस दलातून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्याच वर्षी ते काँग्रेसमधून लोकसभेत निवडून गेले होते. 1988 साली त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्याखाली कारवाई करण्यात आल्याने त्यांची खासदारकी अपात्र ठरविण्यात आली होती. झेडपीची स्थापना केल्यानंतर ते सर्वात प्रथम 2003 साली आमदार झाले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news