पुणे

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दुहेरी वाहतुकीचे आदेश रद्द

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बोपोडी ते फुटबॉल मैदान (सीएफव्हीडी) यादरम्यान दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या दुहेरी वाहतुकीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. या भागात मेट्रो स्थानकाचे काम सुरू आहे. दुहेरी वाहतुकीमुळे कोंडी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक बोपोडी, खडकी बाजारमार्गे पुण्याकडे वळविण्यात आली आहे.

मेट्रोच्या कामामुळे दोन वर्षांपूर्वी बोपोडी चौकातून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून पुण्याकडे जाणारी वाहतूक बोपोडी चौकमार्गे खडकी बाजाराकडे वळविण्यात आली आहे. 6 एप्रिलपासून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बोपोडी चौक ते फुटबॉल मैदान यादरम्यान दुचाकी, तीनचाकी वाहनांना वाहतुकीस परवानगी देण्यात आली होती. खडकी भागात मेट्रो स्थानकाचे काम सुरू असल्याने दुचाकी, तीनचाकी वाहनांसाठी देण्यात आलेला आदेश रद्द करण्यात आला आहे.

चर्च चौक ते बोपोडी चौक यादरम्यान जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होणार आहे. या भागात दुहेरी वाहतूक सुरू ठेवल्यास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी सुरू करण्यात आलेल्या दुहेरी वाहतुकीचे आदेश रद्द करण्यात येत असल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे. बोपोडी चौकातून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पुण्याकडे जाणार्‍या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी बोपोडी चौकातून खडकी बाजारमार्गे पुण्याकडे जावे, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT