राजकारण : पवारांनी पेरले, तेच उगवले!

शरद पवार
शरद पवार
Published on
Updated on

सुरेश पवार

'लोक माझे सांगाती' हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आत्मवृत्त. आपल्या 'कात्रजचा घाट' प्रयोगाची त्यांनी या आत्मवृत्तात भलावण केली आहे. "कात्रजचा घाट दाखवणे हा शब्दप्रयोग मी करीत असलेल्या राजकारणाबाबत अनेकदा वापरला गेला. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आपल्या डावपेचांचा थांगपत्ता लागू न देणे ही हातोटी राजकारणात असावी लागते. माझ्याकडे ती आहे आणि तिचा वापर मी खुबीने करीत आलो आहे." हे त्यांचे आत्मवृत्तातील भाष्य, त्यांच्या आजवरच्या नागमोडी राजकारणावर लख्ख प्रकाश टाकणारे आहे.

सोयीस्कर राजकारणाप्रमाणे त्यांनी आपल्या भेदनीतीचा आणि कात्रज प्रयोगाचा आपल्या निकटवर्तीयांवर वापर केला आणि महाराष्ट्रातील अनेक मातब्बर घराण्यांत दुहीची बीजे पेरली. शरद पवार यांनी गेल्या 40-45 वर्षांत जो उद्योग केला, त्यातून काँग्रेस संघटना दुर्बल होत गेली आणि आज ते ज्या भाजपच्या नावाने बोटे मोडत आहेत, त्या भाजपला हात-पाय पसरायला वाव मिळाला. त्यांनी जे इतरांबाबत केले, तेच आता त्यांच्यावर उलटले. काँग्रेस पक्ष खिळखिळा करण्याच्या नादात त्यांचाच पक्ष फुटला, ते स्वत: मूठभर सहकार्‍यांचे नेते ठरले आणि अनेक घराण्यांत फूट पाडणारी त्यांची खेळी त्यांनाच भोवून, त्यांच्याच घराण्यात बेबनाव झाला.

त्यांच्या 1978 च्या 'पुलोद' प्रयोगामुळे काँग्रेस पक्षाच्या संघटनेला तडे गेले. 21 वर्षांनी 1999 मध्ये त्यांनी हाच प्रयोग पुन्हा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा वेगळा तंबू थाटला. त्या वेळेपासून काँग्रेस पक्ष खिळखिळा करण्याच्या प्रयत्नाबरोबर त्यांनी बड्या घराण्यात भाऊबंदकी माजवण्याची व्यूहरचना केली.

दादांचे घराणे फोडले

1978 मध्ये 'पुलोद' प्रयोगावेळी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतरावदादा पाटील यांना अंधारात ठेवून पवारांनी त्यांचे सरकार पाडले होते. आपल्यापेक्षा ज्येष्ठ आणि बलाढ्य नेत्यांचे आणि त्यांच्या घराण्याचेही खच्चीकरण करायचे, हा त्यांच्या राजकीय वाटचालीचा भागच ठरल्याचे पुढील घडामोडींतून स्पष्ट होते. त्यांच्या या राजकीय खेळीचा पहिला बळी ठरले, ते वसंतरावदादा यांचेच घराणे! 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर त्यांनी दादा घराण्यात फूट पाडली. दादांचे पुतणे विष्णुअण्णा यांचे चिरंजीव मदन पाटील यांना आपल्या गोटात ओढले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे प्रकाशबापू पाटील आणि राष्ट्रवादीकडून मदन पाटील उभे राहिले. त्यात प्रकाशबापू विजयी झाले; पण दादा घराण्यात भाऊबंदकी झाली.

मोहिते-पाटील घराण्यावर रोख

मोहिते-पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील बडे घराणे. सोलापूरसह इतर काही जिल्ह्यांत त्यांचा दबदबा. पवार यांचे उपद्रवमूल्य लक्षात घेऊन विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादीत सामील झाल्याचे बोलले जाते. याच विजयसिंह पाटील आणि प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्यात पवारांनी बेबनाव घडवल्याचे सांगितले जाते. विजयसिंह मोहिते-पाटील पंढरपूर मतदारसंघातून 2009 च्या विधानसभा निवडणुकीत भारत भालके यांच्याकडून पराभूत झाले. त्यामागे बोलविते धनी कोण होते, हे जाणकारांना माहीतच आहे.

मुंडे घराण्यात फूट

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्वकर्तृत्वाने स्वत:चे घराणे नावारूपाला आणले. राजकीय वर्चस्व निर्माण केले. त्यांनी सातत्याने शरद पवार यांच्या धोरणांवर हल्लाबोल केला. पवार यांच्या मनात हा सल निश्चितच असणार. त्यांनी वेळ येताच मुंडे घराण्यात फाटाफूट घडवून आणली. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे भाऊ-बहीण अलग करण्यामागे पवारांचेच डावपेच होते. शरद पवारांनीच आपले घर फोडले, असे गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर सभेत सांगितले होते आणि पवारांचेही घरही फुटेल, असे भविष्य त्यांनी वर्तवले होते.

मराठवाड्यातील दुसरे एक घराणे क्षीरसागर यांचे. केशरकाकू क्षीरसागर यांचे चिरंजीव जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यात पवार यांनीच फूट पाडल्याचे सांगितले जाते.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील राजळे घराणे हे महत्त्वाचे घराणे. आप्पासाहेब राजळे यांच्या स्नुषा मोनिका राजळे आणि त्यांचे दीर शिवशंकर राजळे यांच्यामध्ये अंतर निर्माण करण्यामागे पवार यांचाच हात असल्याचे बोलले जाते.

गावोगावी अनेक घरांत फूट

राज्यातील काही प्रमुख घराण्यांतील बेबनावाचा या ठिकाणी आढावा घेतला आहे; पण पवारांनी 1999 मध्ये वेगळी चूल मांडल्यावर अनेक गावागावांत एकेका घरात भाऊबंदकी उफाळून आली. एका घरात दोन्ही काँगे्रसच्या फळ्या झाल्या. एकेकाळच्या एकसंध, बलदंड असलेल्या काँग्रेसची वाताहत झाली. पवार यांचे राजकीय डावपेच त्याला बर्‍याच अंशी कारणीभूत ठरले, अशीच इतिहासात नोंद होईल, यात शंका नाही.

निकटवर्तीयांचीही ससेहोलपट

शरद पवार यांनी आपल्या अत्यंत निकटवर्तीयांचीही ससेहोलपट केली, असाच निष्कर्ष काढावा लागतो. त्यांच्याबरोबर सर्वप्रथम आलेल्यांत खा. सदाशिवराव मंडलिक यांचा समावेश होता. याच निष्ठावंत मंडलिक यांना 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी उमेदवारी नाकारली. प्रचारसभेत 'म्हातारा बैल' म्हणून पवारांनी त्यांची संभावना केली. या निवडणुकीत मंडलिक अपक्ष म्हणून निवडून आले. पवारांचा उमेदवार पडला. पवारांना आपले शब्द गिळावे लागले. शरद पवार यांनी मंडलिकांना उद्देशून, "बैल म्हातारा झाला की, त्याला कामातून बाजूला केले जाते," असे उद्गार काढले होते. आता "आपले वय 83 झाले. आपण कधी रिटायर होणार," असा सवाल पुतणे अजित पवार यांनी केला आहे.

एके काळी शरद पवार यांनी मंडलिक यांच्याविषयी जे शब्द उच्चारले होते तेच त्यांच्यावर आता उलटले आहेत.
दत्ता मेघे, पद्मसिंह पाटील असे अनेक निष्ठावंत निकटवर्तीय त्यांच्या दुटप्पीपणाला कंटाळून दूर झाले. त्यांचे उजवे हात मानले जाणारे प्रफुल्ल पटेल हे त्यांचे अत्यंत जवळचे. ते नुकतेच अजित पवार यांच्याबरोबर पक्षातून बाहेर पडले आहेत. त्यांनी तर "आपण पुस्तक लिहिणार आहोत. त्यात अंदर की बात कळेल," असे पवारांना जाहीर आव्हानच दिले आहे.

पाडापाडी आणि कुरघोडीचे राजकारण

विजयसिंह मोहिते-पाटलांना निवडणुकीत पवार आपल्याला दगा-फटका करतील, अशी भीती असे. ती खरी ठरली. त्यांच्याप्रमाणेच हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवामागे कोणाचा हात होता, हे जाणकारांना माहीत आहे. अनंतराव थोपटे आणि त्यांचे चिरंजीव संग्राम थोपटे यांनाही त्यांच्या राजकीय कुरघोडीचा त्रास झाला. महाविकास आघाडी सरकारवेळी विधानसभा अध्यक्षपद दीड वर्षे रिक्त होते. काँग्रेसचे संग्राम थोपटे यांचे नाव त्यासाठी होते; पण पवार यांनी ते घडू दिले नाही, असेच म्हटले जाते.

कृतकर्माची फळे

पवार यांनी आजवर जे पेरले, तेच आता अखेर उगवले आहे. त्यांचा पक्ष फुटला. त्यांचे घरही फुटले आणि त्यांचे निकटवर्तीय त्यांना सोडून गेले. सांगाती दूर जात आहेत. ही त्यांच्या कृतकर्माचीच फळे नव्हेत काय?

पवारांच्या डावपेचांची काँग्रेसला जाणीव नाही

शरद पवार यांनी 1995 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक उमेदवारांना पाडले. त्यानंतरही काँग्रेससमवेत आघाडी असतानाही, काँग्रेसचे खच्चीकरण व्हावे, यासाठी निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या पराभवासाठी विरोधी उमेदवारांना छुपी रसद पुरवली, हे सारे जगजाहीर आहे. तथापि, काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांना मात्र पवारांच्या या धूर्त चालीचे आकलन आणि जाणीवच झालेली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news