मंचर : महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या संपामुळे आंबेगाव तालुका महसूल विभागाचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहे. निलंबित तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी यांना पुन्हा सेवेत घेणे, नायब तहसीलदार ग्रेड पे, कालबद्ध पदोन्नती तसेच तहसीलदार ग्रेड पे आदी मागण्यांसाठी हा संप सुरू असून, त्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसत आहे.
सातबारा उतारे, फेरफार नोंदी, पीक पाहणी, नुकसान भरपाई प्रस्ताव, विविध दाखले, वारसा नोंदी, जमिनीची मोजणी आदी महत्त्वाची कामे प्रलंबित राहिली आहेत. रब्बी हंगामाच्या तोंडावर आवश्यक कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे.
अनेक गावांतील तहसील कार्यालयांत शुकशुकाट पसरला असून, अर्ज स्वीकारणे तसेच निर्णयप्रक्रिया पूर्णतः बंद आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रशासनाशी संबंधित असल्या तरी त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः कर्ज प्रकरणे, पीकविमा दावे, नुकसान भरपाई तसेच विविध शासकीय योजनांचे लाभ अडकल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून या संपावर तोडगा काढावा व महसूल कार्यालयांचे कामकाज सुरळीत करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
संपामुळे सातबारा व फेरफार नोंदी रखडल्या आहेत. नुकसान भरपाईचे अर्जही पुढे जात नाहीत. कार्यालयात कोणीच नसल्याने रोज चकरा माराव्या लागत आहेत.”ऋषिकेश गावडे, शेतकरी, गावडेवाडी
कर्ज व पीकविम्याच्या कामांसाठी आवश्यक कागदपत्रे अडली आहेत. पेरणी व पिकांची कामे सुरू असताना महसूल कार्यालय बंद असल्यासारखी परिस्थिती आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा.”प्रा. दत्तात्रय भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेस नेते, कळंब