पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कुटुंबातील कर्त्या माणसाचा मृत्यू झाल्याने अनेकाचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यांना सावरण्यासाठी आर्थिक मदत म्हणून राज्य शासनाकडून त्या कुटुंबास 50 हजारांची मदत केली जाते.
त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातून 6 हजारांपेक्षा अधिक अर्ज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यातील 647 अर्जांतील त्रृटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.
कोरोनामुळे शहरात आतापर्यंत एकूण 3 लाख 58 हजार 351 जण बाधित झाले होते. तर, 4 हजार 618 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांस 50 हजाराचे आर्थिक सहाय्य राज्य शासनाच्या आपत्ती प्रतिसाद निधीतून दिले जात आहे.
त्यासाठी ऑनलाइन माध्यमातून राज्य शासनाच्या पोर्टलवर अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाते.
त्यासाठी शहरातील एकूण 6 हजार 59 जणांनी अर्ज केले आहेत. विविध कारणांनी त्यापैकी 647 अर्जात त्रृटी आढळून आल्या आहेत. अर्जासोबतच्या कागदपत्रांमध्ये झालेल्या चुका व आधार कार्ड क्रमांक चुकल्याने, कोरोना मृत्यूचे प्रमाणपत्र नसणे, मृत्यूचे कारण नोंदविलेले नसणे, त्यासोबतच आवश्यक कागदपत्रे न जोडल्याने अर्ज रोखून ठेवण्यात आले आहेत.
त्या अर्जातील त्रृटी दूर करण्यासाठी पालिकेच्या वतीने विशेष शिबिर पिंपरी कॅम्पातील जिजामाता रुग्णालयात घेण्यात आले. संबंधित अर्जदारांना बोलावून अर्जासंदर्भातील न दिलेली आवश्यक कागदपत्रे पडताळून घेण्यात आली.
कोरोना मृत्यूचे प्रमाणपत्र नसलेल्यांना ते उपलब्ध करून देण्यात आले. अर्जाची त्रृटी भरून काढून ते अर्ज ऑनलाइन सादर करण्यात आले. पात्र अर्जदारांच्या बँक खात्यात 50 हजारांची रक्कम जमा केली जात आहे. शिबिरानंतरही अर्जातील त्रृटी दूर करण्यासाठी सहाय्य केले जात आहे.