पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळा अंर्तगत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या एका सुरक्षारक्षकावर सुधारगृहा बाहेर आलेल्या बालगुन्हेगाराने कुर्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत सुरक्षारक्षक राजेंद्र विठ्ठल देडे (वय-51,रा.चिखली,पुणे) हे जखमी झाले आहे.
याप्रकरणी त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. राजेंद्र देडे हे बालन्यायमंडळ, येरवडा याठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करत असून ते पूर्वी येरवडा येथील बालसुधारगृहात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. चार एप्रिल रोजी रात्री दहा वाजण्याचे सुमारास येरवडा परिसरातील गुंजन चौकात सरगम हॉटेलजवळ ते उभे असताना, सध्या बालसुधारगृहा बाहेर असलेला व त्यांच्या तोंड ओळखीचा अल्पवयीन मुलगा त्यांच्या जवळ आला.
जवळ येताच त्याने 'मी बालसुधारगृहात असताना तुला लई माज आला होता का, आज तुला दाखवतोच तुझा खेळच खल्लास करतो', असे म्हणत त्याच्या हातातील कुर्हाडीने राजेंद्र देडे यांच्या डोक्यात जीवे ठार मारण्यासाठी वार केला. देडे यांनी सदर वार चुकवला असता तो वार त्यांच्या उजव्या हाताने अडविल्याने उजव्या हाताचे पंजाजवळ, मनगटावर गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस पुढील तपास करत आहे.