पुणे: शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 (टीएआयटी) या ऑनलाइन परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणार्या उमेदवारांना राज्य परीक्षा परिषदेने दिलासा दिला आहे.
या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी ज्या उमेदवारांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी (एनसीएल) अर्ज केला आहे, त्या उमेदवारांना पोचपावतीच्या आधारे अर्ज भरण्यास परवानगी देण्यात आली असून, ही पोचपावती 14 मेपूर्वीची असणे आवश्यक आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. (latest pune news)
परीक्षा परिषदेतर्फे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र प्रणालीद्वारे होणार्या भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्यात आली आहे. 24 मे ते 5 जून या कालावधीत परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या परीक्षेच्या ऑनलाइन अर्जांसाठी आणि शुल्क भरण्यासाठी 14 मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. परंतु अर्ज भरताना काही उमेदवारांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र उपलब्ध नसलेल्या उमेदवारांना अर्ज भरताना अडचण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ज्या उमेदवारांनी विद्यार्थ्यांनी एनसीएल प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केला आहे, अशा उमेदवारांना पोचपावतीच्या आधारे आवेदनपत्र भरण्यास परवानगी देण्यात येत आहे.
पोचपावतीवरील दिनांक हा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत, म्हणजेच 14 मेपर्यंत असल्यास संबंधित पोचपावती ग्राह्य धरण्यात येईल. याच पोचपावतीनुसार मिळालेले एनसीएल प्रमाणपत्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या माध्यमातून होणार्या पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.