पुणे: पाण्याची गळती रोखण्यासाठी पुणे महानगर पालिकेने स्मार्ट एएमआर मीटर बसवण्यास सुरुवात केली आहे. समानपाणी पुरवठा योजनेअंतर्गत हे मीटर बसवले जात आहेत. तब्बल अडीच हजार कोटींच्या या योजनेतून शहरात 2 लाख 82 हजार पाणीमीटर बसवले जाणार आहेत. आतापर्यंत केवळ 1 लाख 70 हजार पाणी मीटर बसवण्यात आले आहेत.
यातील 35 हजार पाणीमीटरमधून रीडिंगनुसार घरटी 200 ते 400 लिटर पाणी दिले जात आहे. केवळ 60 टक्के मीटर बसवण्याचे काम पूर्ण झाले असून अद्याप 40 टक्के काम बाकी असल्याने पालिकेला पूर्ण क्षमतेने बिल आकारता येत नसून पाण्याची गळती देखील रोखण्यास पाणी पुरवठा विभागाला अपयश येत आहे. (Latest Pune News)
पुणे महापालिकेककडून शहरात समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार जलवाहिन्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. तसेच नळजोडला एएमआर पाण्याचे मीटर बसण्याचे काम सुरु आहे.
मात्र हे मीटर बसविण्यास नागरिकांकडून तसेच सोसायट्यांकडून विरोध केला जात आहे. मीटर बसविण्यात येत नसल्याने पाणी गळती शोधणे कठीण असून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. त्यामुळे एएमआर पाणी मीटर बसविण्यास विरोध केल्यास थेट नळजोड बंद करण्यात येणार असल्याचा इशारा पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या धरण साखळीत मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी वापरत असल्याने पालिकेला जलसंपदा विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे, तसेच पाणी जपून वापरण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान पाणी गळती शोधून पाण्याची बचत करण्याचे उद्दिष्ट पाणी पुरवठा विभागाने ठेवले आहे.
त्यामुळे समान पाणीपुरवठा योजनेनुसार मीटर बसविण्याच्या कामाला गती दिली जात आहे. आता पर्यंत 1 लाख 80 हजार मीटर बसविण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी मीटर बसविण्यात आले आहेत, त्या भागातील पाणी गळती शोधण्यास तसेच पाण्याचा अधिक वापर केल्यास त्याची देखील माहिती पालिकेला मिळत आहे.
मात्र, केवळ 35 हजार पाणीमीटरमधून रीडिंगनुसार घरटी 200 ते 400 लिटर पाणी दिले जात आहे. यामुळे हे मीटर बसवण्याची सक्ती पाणीपुरवठा विभाग सोसायट्यांना करत आहे. मात्र, बसवण्यात आलेल्या मीटरद्वारे पूर्ण क्षमतेने पाणी पट्टी वसूल करण्यास अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे स्मार्ट मीटरचा सावळा गोंधळ सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
मीटर सक्तीचा प्रस्ताव आयुक्तांकडून प्रलंबित
पाणी पुरवठा विभागामार्फत मीटर बसविण्याची सक्ती केली जात आहे. मात्र, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे हा प्रस्तावाला अद्याप मान्यता देण्यात आली नाही. या वर्षीपासून मीटरद्वारे पाण्याचे बिल आकारण्याची घोषणा देखील करण्यात आली होती. मात्र, अद्याप हा प्रस्ताव मंजूर झाला नसल्याने मीटरसक्ती रखडलेली आहे.
नागरिकांकडून देखील असहकार्य
समान पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत सध्या प्राधान्याने अस्तित्वातील नळजोडास एएमआर मीटर बसविण्यासाठी नागरिकांकडून आवश्यक सहकार्य करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. मिळकतीमधील नळजोडास एएमआर मीटर बसविण्यासाठी विरोध होत असल्याने अद्याप मीटर बसविण्यात आले नसल्यामुळे साठवण टाकीवरून पुरविण्यात येणार्या पाण्याचे मोजमाप करणे व गळती शोधणे अडचणीचे होत आहे.
पाण्याची गळती कमी करून नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचे मोजमाप करणे आवश्यक असून त्यासाठी नळजोडास तातडीने एएमआर मीटर बसवणे गरजेचे आहे.