पुणे

निवृत्तांना दिलासा ! विनाविलंब वेतन मिळणार; पेन्शन सुरू होण्याचा मार्ग मोकळा

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या 25 हजार अधिकारी, कर्मचार्‍यांना यापुढील काळात विनाविलंब वेतन मिळणार आहे, तसेच सेवानिवृत्त झाल्यानंतर तातडीने पेन्शनही मिळणार आहे. यासाठी महापालिकेने ऑनलाइन सॉफ्टवेअर तयार केले असून, एप्रिलच्या वेतनापासून सॉफ्टवेअरचा वापर सुरू होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली. महापालिकेकडे जवळपास 21 हजार अधिकारी व कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत आहेत. तसेच, सेवेतून निवृत्त झालेल्या 20 हजार कर्मचार्‍यांना पेन्शन सुरू आहे. दरमहा प्रत्येक अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे वेतन व अन्य देणी देण्यासाठी विभागवार बिल क्लार्कची नेमणूक करण्यात आली आहे. हे बिल क्लार्क कर्मचार्‍यांच्या सुट्या, रजा व अन्य बाबींची आकडेमोड करून वेतनचिठ्ठी तयार करतात.

या वेतनचिठ्ठीनुसार संबधितांचे मासिक वेतन थेट बँक खात्यावर जमा केले जाते. मात्र, अनेकदा पगार बिले सादर करण्यास विलंब झाल्यानंतर वेतनास विलंब होतो. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मागीलवर्षी पगार आणि पेन्शनसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्याचा निर्णय घेतला. या सॉफ्टवेअरवर कार्यरत अधिकारी आणि कर्मचार्‍यांची संपूर्ण माहिती, वेतनश्रेणी आणि त्यानुसार देण्यात येणारे भत्ते, सर्व्हिस बुकमधील माहिती अपलोड करण्यात आली आहे, तर पेन्शनरांची माहिती अपलोड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मागील तीन महिन्यांपासून प्रशासनाने हे सॉफ्टवेअर आणि जुन्या पद्धतीने पगार करण्यास प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात केली. यामध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करण्यात आल्या. या नव्या सॉफ्टवेअरचे सर्व पगार बिल क्लार्कला प्रशिक्षणही देण्यात आले आहे. एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर एप्रिल महिन्याचे वेतन मेमध्ये या सॉफ्टवेअरद्वारे करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती बिनवडे यांनी दिली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT