बार्टी संस्थेतील कंत्राटी कर्मचारी  Pudhari
पुणे

Barti News : बार्टी संस्थेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा; मानधनात इतक्या टक्क्यांची वाढ

बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मानधनात मागील 12 वर्षांपासून कोणतीही वाढ झालेली नव्हती

पुढारी वृत्तसेवा

पुणे :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण (बार्टी) संस्थेत गेल्या 12 वर्षांपासून मानधनावर काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यानुसार 46 टक्के वाढ करण्यात आली आहे. हे कर्मचारी अनेक वर्षापासून मानधनावर काम करत आहेत. यावाढीमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

मंत्री शिरसाट म्हणाले, वाढत्या महागाईमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी लक्षात घेता ही वाढ अत्यंत आवश्यक होती. या निर्णयामुळे जात पडताळणी कार्यालये, बार्टी मुख्यालय, उपकेंद्रे तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मानधन वाढ या मागणीवर समाधानकारक तोडगा निघाला आहे. कर्मचार्‍यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय म्हणजे सामाजिक न्यायाची खरी अंमलबजावणी असल्याची भावना सर्व कर्मचार्‍यांनी व्यक्त करुन सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांचे आभार मानले आहेत.

कर्मचा-यांचे वाढलेले मानधन 1 मार्चपासून लागू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथे कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मानधनात मागील 12 वर्षांपासून कोणतीही वाढ झालेली नाही.बार्टीमध्ये सुमारे 1200 कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी स्मार्ट सर्विसेस प्रा. लि. या बाह्यस्त्रोत कंपनीमार्फत सफाई कर्मचारी, वाहन चालक, कार्यालय सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, आस्थापना सहाय्यक, संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, समतादूत व तालुका समन्वयक अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. हे कर्मचारी बार्टीच्या मुख्यालयासह महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, येवला येथील मुक्तिभूमी, नागपूर विभागीय कार्यालय आणि राज्यातील सर्व जिल्हा जात पडताळणी समित्यांमध्ये कार्यरत आहेत. संस्थेमार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य जनतेपर्यंत पोहोचवणे आणि शासनाकडून मिळणार्‍या 300 कोटी रुपयांच्या वार्षिक निधीचा योग्य विनियोग करणे यांसारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये या कर्मचार्‍यांचा मोठा सहभाग आहे.

कर्मचार्‍यांनी मानधन वाढीबाबत वेळोवेळी संस्थेचे महासंचालक सुनील वारे आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांना निवेदने दिली आहेत. या संदर्भात मंत्र्यांसोबत बैठका होऊनही ठोस निर्णय न झाल्याने कर्मचार्‍यांनी 13 फेब्रुवारी 2025 रोजी काम बंद आंदोलन सुरू केले होते. तेव्हा महासंचालक सुनील वारे यांनी फेब्रुवारीच्या मानधनात वाढ करण्याचे आणि मार्चमध्ये सुधारित वेतन देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

वेतन वाढीबात यापूर्वी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे आणि 2021 मध्ये निविदा प्रक्रिया देखील राबविण्यात आली होती. माजी नियामक मंडळाच्या 36 व्या बैठकीत डिसेंबर 2024 मध्ये पुन्हा पोर्टलवर मानधन वाढीसह पुरवठादार निवड प्रक्रियेसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे मागील 12 वर्षांपासून प्रलंबित असलेला बाह्य कर्मचार्‍यांच्या मानधन वाढीचा प्रश्न अखेर मार्गी लागलेला आहे . प्रशासनाने सर्व तांत्रिक बाजू आणि महागाई भत्ता विचारात घेऊन ही मानधन 46% ने वाढ मंजूर केली आहे. ही वाढ 1 मार्च 2025 पासून लागू करण्यात आली आहे.

बार्टी ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था आहे. राज्यातील इतर सामाजिक न्याय विभागाच्या संस्था जसे की सारथी, महाज्योती आणि आर्टी येथील बाह्यस्त्रोत कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ झाली आहे आणि त्यांना सध्याच्या वेतनश्रेणीनुसार वेतन मिळत आहे. मात्र बार्टीतील कर्मचार्‍यांच्या मानधनात गेल्या 12 वर्षांपासून कोणतीही वाढ न झाल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT