पुणे

किचकट अर्जात अडकली पुणे ’झेडपी’ची नोकरभरती

अमृता चौगुले

पुणे : जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी अर्ज तयार करण्यात आला. मात्र, हा अर्ज अतिशय किचकट तयार करण्यात आला असून, राज्यातील काही जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी (सीईओ) त्यावर आक्षेप नोंदविला आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीसाठी करण्यात आलेल्या संकेतस्थळाची पूर्वचाचणी नुकतीच घेण्यात आली. जिल्हा परिषदेत कर्मचार्‍यांची कमतरता भरून काढण्यासाठी राज्यात जिल्हा परिषदेची विविध पदांची भरती केली जाणार आहे. कर्मचारी भरतीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीकडून संकेतस्थळ तयार करून त्यावरील अर्जाचे प्रात्यक्षिक राज्यातील जिल्हा परिषदांना करण्यात आले.

मात्र, जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठी इच्छुक असलेल्या ग्रामीण भागातील व्यक्तीलादेखील अतिशय सहजसुलभरीत्या अर्ज भरता यावा तसेच क्लिष्ट आणि जास्त लांबीचा अर्ज न बनवता, मोबाईलवरदेखील अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना शक्य होईल, यावर भर देण्यात यावा, असादेखील काही सीईओंनी अभिप्राय कळविला आहे. सध्याचा अर्ज जर कायम राहिला तर अर्ज भरण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो, त्यामुळे कंपनीला अर्जामध्ये बदल करण्यास राज्यातील विविध जिल्हा परिषदांनी कळविले आहे. पुणे जिल्हा परिषदेत एक हजार कर्मचार्‍यांची भरती केली जाणार आहे. जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची कर्मचारी भरती मागील सुमारे दहा वर्षांपासून रखडलेली आहे. अद्यापही भरतीसंदर्भात केवळ वेगवेगळ्या पातळीवर कामे सुरूच असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

दोन महिन्यांपूर्वी अभ्यासक्रम निश्चित
जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीला कुठल्या ना कुठल्या कारणाने विलंब होत आहे. भरतीच्या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी विविध सहा राज्यस्तरीय समित्यांची स्थापना केली होती. या समित्यांनी या परीक्षेचा अभ्यासक्रम तयार करून दिला आहे. अभ्यासक्रमाला मंजुरी देत, भरतीबाबतची मार्गदर्शक नियमावलीही ग्रामविकास विभागाने तयार करून 15 मे 2023 रोजी जिल्हा परिषदेला पाठविली आहे. त्यानंतर जून महिन्यामध्ये कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी असल्याची माहिती पुढे आली. जि. प. कर्मचार्‍यांची 2016 पासून आतापर्यंत एकदाही भरती झालेली नसल्याने अनेक उमेदवार या भरतीच्या जाहिरातीच्या प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT