पिंपरी : वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाई सुरू आहे. मागील आठ महिन्यांत तब्बल दहा कोटी इतका दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील वाहनचालकांमध्ये सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. यातील विशेष बाब म्हणजे एकच नियम दोनपेक्षा जास्त वेळ मोडणार्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे तुम्ही कितीही दंड आकारा, आम्ही सुधारणार नाही, अशीच काहीशी आडमुठी भूमिका चालकांनी घेतल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी शहरातील रस्त्यांवर वाहतूककोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. बेशिस्त चालकांमुळे कोंडीमध्ये आणखीनच भर पडत असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. बेशिस्त चालकांमुळे कित्येकांना आपले प्राण गमवावे लागल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील आठ महिन्यांत नियम मोडणार्या चालकांकडून नऊ कोटी 95 लाख पाच हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र, तरीही वाहनचालकांमध्ये सुधारणा होत नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळावी, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमपीएमएल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर बीआरटी मार्ग उभारण्यात आले आहेत. मात्र, या मार्गामध्ये हजारोंच्या संख्येने खासगी वाहनचालक घुसखोरी करतात. वाहतूक पोलिस अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करतात. मागील आठ महिन्यांमध्ये अशा 44 हजार 986 वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करीत तब्बल तीन कोटी 10 लाख 41 हजारांचा दंड वसूल केला आहे. मात्र, दोन ते तीन वेळा दंड भरूनही बीआरटी मार्गात वाहनांची घुसखोरी होत असल्याचे समोर येत आहे.
शहरात स्थानिक तरुणांना काळ्या काचांची मोठी क्रेज आहे. वाहतूक पोलिसांची काळ्या काचांवरील कारवाईदेखील नियमित सुरू असते. मागील आठ महिन्यांत तीन कोटी 73 हजार 7 हजार 500 रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. असे असले तरीही तरुणांनी काचांवरील ब्लॅक फिल्म काढून घेतली नाही. त्यामुळे वाहनचालकांना काळ्या काचांच्या दंडाची फिकीर नसल्याचे दिसून येत आहे.
शहरातील रेडियमच्या दुकानांवर वाहनांच्या नंबर प्लेट बनवून मिळतात. चालकाच्या म्हणण्यानुसार फॅन्सी प्लेट बनवून दिल्या जातात. पोलिसांनी आठ महिन्यांत फॅन्सी नंबर प्लेट असणार्या 18 हजार 869 वाहनांवर कारवाई केली आहे. असे असले तरीही अनेक वाहनांवर फॅन्सी नंबर असल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहनांसोबतच फॅन्सी नंबर प्लेट बनवून देणार्या दुकानदारांवरदेखील कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मागील आठ महिन्यांत 251 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्राणांतिक अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, तरीही चालकांनी यातून धडा घेतला नसल्याचे कारवाईच्या आकडेवारीवरून अधोरेखित होत आहे.
हेही वाचा