पांडुरंग सांडभोर
पुणे: महापालिका निवडणुकीसाठी पुणे महापालिकेची प्रभाग रचना नव्याने होणार आहे. मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना 2017 नुसारच ’जैसे-थे’ राहणार आहे. हद्दवाढ झालेल्या 9 महापालिकांच्या प्रभाग रचना नव्याने करण्याचा आणि 17 महापालिकांची आहे तीच रचना कायम ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयांच्या आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार आता निवडणुकीच्या प्रकियेला सुरुवात झाली आहे. न्यायालयाने चार आठवड्यांत प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. (Latest Pune News)
ही मुदत मंगळवारी संपली. त्यानुसार प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य शासनाने निश्चित केला असून, त्यासंबधीचे आदेश जाहीर होणार आहेत. दरम्यान महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका होणार आहेत.
2017 च्या महापालिका निवडणुका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर अनेक महापालिकांची हद्दवाढ झाली आहे. तसेच 2017 पूर्वी निवडणुका झालेल्या काही महापालिकांमध्ये दोन सदस्यांचे प्रभाग होते.
त्यामुळे हद्दवाढ झालेल्या आणि ज्या ठिकाणी दोन अथवा इतर प्रभाग रचना होती अशा पुण्यासह नऊ महापालिकांमध्ये नव्याने चार सदस्यांची प्रभाग रचना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले. त्यामध्ये नवी मुंबई, कल्याण-डोंबवलीसह नगर परिषदांमधून नव्याने महापालिकेचा दर्जा मिळालेल्या काही महापालिकांचा समावेश आहे.
तर पिंपरी चिंचवडसह उर्वरीत 17 महापालिकेची निवडणूक मात्र 2017 मध्ये जे प्रभाग होते, त्यानुसारच घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. मुंबई महापालिकेतही 2017 प्रमाणेच एक सदस्यीय वॉर्ड रचना कायम राहणार आहे. दरम्यान प्रभाग रचनेचा सविस्तर कार्यक्रम आज जाहीर होईल असेही सांगण्यात आले.