पुणे: शेतकरी चांगल्या पद्धतीने उत्पादन करतात. मात्र, त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकर्यांना कीड व रोगविरहित रोपे पुरविण्याचे महत्त्वाचे आहे. यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. हे लक्षात घेऊनच देशभरात नऊ स्वच्छ रोपनिर्मिती केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यातील तीन केंद्र महाराष्ट्रात उभी केली जाणार असल्याची
घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. त्यात द्राक्षासाठी पुण्यात, नागपुरात संत्रा तर सोलापुरात डाळिंब पिकांच्या रोपांची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून 300 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, असेही ते म्हणाले. (Latest Pune News)
पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन स्पर्धेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादनमंत्री भरत गोगावले, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे उपस्थित होते.
चौहान म्हणाले की, देशात महाराष्ट्र फलोत्पादनात आघाडीवर असून, यापुढे महाराष्ट्राने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्व करावे. पुणे परिसरात द्राक्षांची लागवड मोठ्या प्रमाणावर असल्याने येथे द्राक्षरोपे, नागपूरमध्ये संत्रा तर सोलापूरमध्ये डाळिंबरोपांची निर्मिती केली जाणार आहे. तसेच, शेतकर्यांना मोठ्या रोपांच्या रोपवाटिकांसाठी तीन कोटी, तर मध्यम प्रकारच्या रोपवाटिकेसाठी दीड कोटी रुपयांचे अनुदानही दिले जाईल. या कार्यक्रमांतर्गत इस्राईल व नेदरलँड या देशांचेही योगदान घेतले जाणार आहे.
देशभरात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या 113 संस्था असून, सुमारे 16 हजार शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. प्रयोगशाळांमध्ये होणारे संशोधन शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्याची गरज आहे. शेतकरी देखील अनेक प्रकारचे संशोधन करून चांगले उत्पादन घेतात. या दोघांची सांगड तसेच कृषी विभाग आणि विद्यापीठांचे सहकार्य घेतल्यास शेती क्षेत्रात मोठा चमत्कार घडू शकेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
फडणवीस म्हणाले की, शेतीचा उत्पादन खर्चवाढ आणि त्यासोबत शेतीसाठी आवश्यक पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. हॅकेथॉनमध्ये मांडलेले तंत्रज्ञान शेतकर्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन आणि तंत्रज्ञान शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन कृषी महाविद्यालयांमध्ये इन्क्युबेशन केंद्र तयार करावीत. या तंत्रज्ञानांचे व्यावसायिक उत्पादनाच्या रूपात विकसित करून शेतकर्याला लाभ द्यावा. शेती क्षेत्रात संशोधन करणार्यांनी शेतकर्यांशीही नाते जोडावे, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला.
केंद्र आणि राज्य शासन मिळून क्रॉप कव्हरच्या क्षेत्रात योजना आणता आली, तर राज्य सरकारची सकारात्मक भूमिका असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रास्ताविक केले. संजय काचोळे यांनी आभार मानले.