Pune Municipal Election Analysis Pudhari
पुणे

Pune Municipal Election Analysis: रविवार पेठ–नाना पेठ प्रभागात भाजप–राष्ट्रवादी प्रत्येकी दोन जागांवर

प्रभाग २३ मध्ये आंदेकर कुटुंबाचा दबदबा कायम; स्थानिक प्रश्नांवरच निकालाची दिशा

पुढारी वृत्तसेवा

गणेश खळदकर

पुणे: पुणे शहरातील हार्ट ऑफ सिटी असा प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक 23 म्हणजे रविवार पेठ-नाना पेठ प्रभागात यंदा दोन जागा भाजपने, तर दोन राष्ट्रवादीने जिंकल्या. तसेच, प्रभागातील आंदेकरांचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक 23 मधील रविवार पेठ-नाना पेठ भागातील प्रभाग अ मधून भाजपच्या पल्लवी जावळे, प्रभाग ‌‘ब‌’ मधून राष्ट्रवादी काँग््रेासच्या सोनाली आंदेकर, प्रभाग ‌‘क‌’ मधून राष्ट्रवादी काँग््रेासच्या लक्ष्मी आंदेकर, प्रभाग ‌‘ड‌’ मधून भाजपचे विशाल धनवडे यांनी निवडणुकीत बाजी मारली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रभाग ‌‘अ‌’ मधून भाजपच्या पल्लवी जावळे यांनी एकहाती निवडणूक जिंकली असल्याचे दिसून आले. त्यांना काँग््रेासच्या अमोल देवळेकर आणि राष्ट्रवादीचे अनिकेत कोठावळे यांनी चांगली टक्कर दिली. परंतु, जावळे यांना 14 हजारांहून अधिक आणि संबंधित दोघांना 9 हजारांहून अधिक मते मिळाली. देवळेकर आणि कोठावळे यांच्यात मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी झाल्यामुळे जावळे यांचा विजय सुखकर झाल्याचे दिसून आले. प्रभाग क्रमांक 23 ‌‘ब‌’ मधून शिवसेनेकडून प्रतिभा धंगेकर, तर राष्ट्रवादी काँग््रेासकडून सोनाली आंदेकर रिंगणात होत्या. प्रभागातील ही हायव्होल्टेज लढत होती. अखेरच्या टप्प्यात रंगलेल्या चुरशीच्या मतमोजणीत सोनाली आंदेकर यांनी विजय मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला. या लढतीकडे विशेष लक्ष लागले होते. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी म्हणून प्रतिभा धंगेकर यांची उमेदवारी प्रतिष्ठेची मानली जात होती. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग््रेासने सोनाली आंदेकर यांच्या माध्यमातून जोरदार आव्हान उभे केले होते. निकालाच्या अंतिम फेरीत सोनाली आंदेकर यांनी बाजी मारली.

प्रभाग क्रमांक 23 क मधून राष्ट्रवादी काँग््रेासच्या लक्ष्मी आंदेकर यांच्यासमोर भाजपच्या ऋतुजा गडाळे यांनी चांगले आव्हान उभे केले होते. परंतु गडाळे यांचा निसटता पराभव झाला. वनराज आंदेकर यांच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेली सहानुभूती आणि आंदेकर कुटुंबातील सदस्यांचा प्रभागात असलेला जनसंपर्क यामुळे सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर तुरुंगात असूनही विजयी झाल्याचे पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक 23 ड मधून विशाल धनवडे यांनी भाजप पक्षातून विजय मिळवला असला, तरी त्यांचे या भागात अगोदरपासूनच वर्चस्व असल्याचे पाहायला मिळाले. 2017 मध्ये शिवसेना पक्षातून निवडून आल्यानंतर विरोधात असूनही मतदारांसाठी केलेल्या कार्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांना चांगला फायदा झाला. त्यामुळे त्यांना तब्बल 16 हजारांहून अधिक मते पडली. तर, राष्ट्रवादी काँग््रेासच्या शाहबाज खान यांनी 9 हजारांहून अधिक मते मिळवत त्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला. परंतु धनवडे यांनी एकहाती विजय मिळवला.

निवडणुकीत हे मुद्दे ठरले महत्त्वाचे

निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवारांनी स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले होते. पेठांमधील जुने वाडे, पाणीपुरवठा व्यवस्था, रस्ते आणि नागरी सुविधा हे मुद्दे प्रचारात महत्त्वाचे ठरले. मतदारांशी थेट संवाद आणि विकासकामांची आश्वासने यावर प्रचाराची दिशा ठरली. त्यामुळे प्रभागातील प्रमुख समस्या सोडविण्याचे आव्हान आता नवनिर्वाचित नगरसेवकांसमोर असणार आहे.

प्रभागाची वैशिष्ट्ये

  • प्रभाग क्रमांक 23 हा प्रचंड दाट लोकवस्ती असलेला हा प्रभाग आहे. या प्रभागात सर्वांत मोठी वाहतुकीची समस्या आहे.

  • या प्रभागाला नवीन 28 हजार लोकवस्तीचा भाग जोडला आहे. जिथे मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यास वाव आहे.

  • या प्रभागात अनेक आरक्षित जागा विकसित करून युवा आणि महिलांसाठी व्यवसाय केंद्र, उद्याने, मैदाने उभारणे गरजेचे आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल तयार करण्यासाठी आंतराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम तयार करण्याची नागरिकांची मागणी आहे.

  • प्रभागात कचऱ्याची विल्हेवाट आणि व्यवस्थापन, वाहतूक कोंडी आणि पुरेशा पार्किंगची व्यवस्था या प्रमुख समस्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT