वडगाव मावळ : मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला असून, पार्किंगचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेतील रस्ता रुंद झाला असला तरी अस्ताव्यस्त पार्किंगमुळे नित्याचाच बनलेला वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार तरी कधी, असा सवाल नागरिक करत आहेत.फ
वडगाव शहर हे मावळ तालुक्याचे मुख्यालय असल्याने याठिकाणी तहसील कार्यालय, न्यायालय, पंचायत समिती, भूमिअभिलेख, वन, सार्वजनिक बांधकाम, दुय्यम निबंधक, सहायक निबंधक अशी विविध शासकीय कार्यालये आहेत. संबंधित सर्व कार्यालये ही शहराच्या मुख्य चौकाच्या परिसरात आहेत, त्यामुळे याच भागात दररोज तालुक्यातून विविध कामांसाठी असंख्य नागरिक येत असतात. याशिवाय रिक्षा व मालवाहतूक वाहनांचे वाहनतळही त्याच चौकात आहे.
दरम्यान, यापैकी न्यायालय व पंचायत समिती वगळता इतर कार्यालयांना स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नाही. न्यायालयाच्या आवारात वकील, पक्षकार तर पंचायत समितीच्या आवारात तेथील अधिकारी, कर्मचारी यांची वाहने पार्किंग केलेली असतात. त्यामुळे इतर कामांसाठी येणारे नागरिक हे मुख्य चौकात, मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंना, रेल्वे स्थानकाकडे, तहसील कार्यालयाकडे जाणार्या तसेच पुणे जिल्हा बँकेकडे जाणार्या रस्त्यावर जागा मिळेल तिथे वाहने लावतात.
अस्ताव्यस्त पार्किंग व वाहतूककोंडीचा सामना विविध कार्यालयात येणार्या शासकीय अधिकारी व पोलिसांनाही करावा लागत आहे. तहसील व भूमिअभिलेख कार्यालयाचे आवारात, पोलिस ठाण्यापुढील रस्त्यावर, पंचायत समिती कार्यालयासमोरील चौकात, रेल्वे स्थानकाकडे जाणार्या रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने लावलेली असतात, यामुळे अधिकारी अन पोलिसांनाही रोज त्रास सहन करावा लागत आहे.फ
याशिवाय मुख्य चौकापासून स्मशानभूमीपर्यंत मुख्य बाजारपेठेतील रस्ता रुंद करण्यात आला असला तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अस्ताव्यस्त वाहने लावलेली असतात. काही वाहने तर कायमस्वरूपी पार्किंग केलेली असतात. त्यामुळे रस्ता रुंद झाला असला तरी अस्ताव्यस्त वाहन पार्किंग केल्याने हा रस्ता वाहतुकीला अपुरा पडत आहे. यासंदर्भात, अनेकदा वर्तमानपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या असून, वडगाव शहर भाजपचे शहराध्यक्ष अनंता कुडे यांच्यासह पदाधिकारी, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर आदींनी गेल्या महिनाभरात सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून वाहतूककोंडी व पार्किंगबाबत योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. परंतु, प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी होणार, हा प्रश्नच असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा