धुळे: चारणपाडा येथे आदिवासी दिनाचा बॅनर फाडल्यावरून दोन गटांत राडा, पोलीस अधिकाऱ्यांसह १८ जण जखमी | पुढारी

धुळे: चारणपाडा येथे आदिवासी दिनाचा बॅनर फाडल्यावरून दोन गटांत राडा, पोलीस अधिकाऱ्यांसह १८ जण जखमी

धुळे, पुढारी वृत्तसेवा : शिरपूर तालुक्यातील चारनपाडा येथे फलक फाडल्याच्या कारणावरून झालेल्या दंगलीत 15 पोलिसांसह तीन गावकरी जखमी झाले आहे. आता या प्रकरणात पोलीस प्रशासनाने दंगल आणि जीवे ठार करण्याच्या प्रयत्नाच्या कलमांसह सुमारे 200 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर गावातून पोलीस प्रशासनाने रूट मार्च करून जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान नागरिकांनी केलेल्या दगडफेकीत शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांच्या गाडीसह पोलीस प्रशासनाच्या सहा गाड्यांचे नुकसान झाले आहे.

शिरपूर तालुक्यातील सांगवी नजीक असलेल्या चारणपाडा येथे आदिवासी दिनानिमित्त फलक लावण्यात आले होते. या फलकाचे नुकसान झाल्याची बाब काही नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर फलकाचे नुकसान केल्याचा जाब विचारण्यासाठी काही तरुण संशयीतांकडे गेले. मात्र यावेळी सुसंवाद होण्याऐवजी हाणामारी झाली. त्यामुळे एक गट मुंबई आग्रा महामार्गावर फलक फाडणाऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यासाठी बसला.

धुळे चारणपाडा

त्यामुळे महामार्गावरील रहदारी ठप्प झाली. दरम्यान वातावरणातील गंभीरता ओळखून सांगवी आणि शिरपूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी जमावाची समजूत घालण्यास सुरुवात केली. मात्र जमाव आंदोलन करण्याच्या विषयावर ठाम होता. दरम्यान ही माहिती मिळाल्याने शिरपूरचे आमदार काशीराम पावरा हे देखील जमावाची समजूत घालण्यासाठी आले. त्यांनी जमावाची समजूत घालण्यास सुरुवात केली. मात्र जमावांमधून घोषणाबाजी आणखीनच वाढली.

 

यावेळी पोलिसांची अधिकची कुमक देखील घटनास्थळी पोहोचली. यानंतर जमाव हिंसक झाला जमावाने मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. तर काही तरुणांनी आमदार काशीराम पावरा यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडी रस्त्यावर उलटवली. तर पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर देखील दगडफेक करण्यास सुरुवात झाली. या दगडफेकीत पोलिसांच्या सहा गाड्यांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी आमदार पावरा यांना सुरक्षेसाठी तातडीने एका घरात हलवले. यानंतर मात्र जमावाने दगडफेक आणखीनच वाढवली. परिस्थिती हिंसक झाल्यामुळे जिल्ह्याभरातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. या दंगलीची माहिती कळाल्याने जिल्हाभरातील पोलीस अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले. या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना टार्गेट केले गेले. दगडफेकीसाठी जमावाकडून गोफनचा देखील वापर केल्या गेल्याचा संशय व्यक्त होतो आहे.

हे झाले जखमी

जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये दोंडाईचा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार ,थाळनेर पोलीस ठाण्याचे दीपक पावरा, सोनगीर पोलीस ठाण्याचे गणेश फड तसेच शिरपूरचे नरेंद्र पवार, या अधिकाऱ्यांसह कैलास ढोले ,रवींद्रकुमार राठोड, जयेश भागवत, मुक्तार शहा, विशाल लोंढे ,प्रवीण अमृतकर, निखिल काटकर, संजय गुजराती, संजय जाधव, भूषण वाडीले, विजयसिंह पाटील, मनोज नेरकर ,पंकज ठाकूर ,गोविंद कोळी, संदीप ठाकरे, विजय पाटील हे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दंगलखोरांवर गुन्हा दाखल

दरम्यान आज सांगवी पोलीस ठाण्यात दंगलखोरांवर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात साहेबराव कोकणी, भगवान कोळी ,विकी कोकणी, रामू कोकणी, उत्तम कोकणी ,अशोक कोकणी ,हिम्मत भोई ,छोटू कोकणी, केशव कोकणी ,अशोक पावरा, आकाश पावरा यांच्यासह 200 जणां विरोधात भादवि कलम 353, 307, 143, 144, 147, 148, 149 ,341, 324 ,326 ,337, 332, 427 सह क्रिमिनल लॉ ऍक्ट कलम 7 व सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम तसेच मुंबई पोलीस कायदा कलमाच्या उल्लंघन आणि हत्यार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तणावपूर्ण शांतता आणि पोलिसांचा बंदोबस्त

चारणपाडा भागातील दंगल रोखण्यासाठी पोलिसांना रात्री उशिरा बळाचा वापर करीत अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यामुळे मध्यरात्री नंतर ही दंगल आटोक्यात आली. दरम्यान सकाळ पासून या भागात राज्य राखीव दलाची एक तुकडी तर दंगल प्रतिबंधक करणाऱ्या दोन तुकड्या यांच्यासह मुख्यालयातील राखीव पोलिसांचे पथक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे .पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील, यांच्यासह अनेक अधिकारी रात्रीपासूनच या भागात तळ ठोकून आहे. तर सकाळपासून या तणावपूर्ण परिसरात पोलिसांनी रूट मार्च करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान दंगलखोराची ओळख पटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली असून अटक सत्र सुरू झाले आहे.

शांततेचे आवाहन

या संदर्भात प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी जनतेला शांतता राखण्याचे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. तर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे .रूट मार्च करून सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वास जागृत करण्याचे काम केले जात आहे. तसेच समाजकंटकांना लवकरच ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

रात्री उशिरापर्यंत महामार्ग जॅम

चारणपाडा गावातून मुंबई आग्रा महामार्ग जातो. याच महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन आणि दगडफेक मध्यरात्रीनंतर देखील सुरू असल्यामुळे या महामार्गावरील रहदारी ठप्प झाली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अखेर महामार्ग पोलीस विभागाचे निरीक्षक हेमंत भामरे, उपनिरीक्षक नरेंद्र पवार ,सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील, राकेश सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक सैंदाणे, कर्मचारी मनोहर जाधव, पोलीस नाईक सचिन गोमसाळे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी ही रहदारी सुरळीत केली. दरम्यान महामार्ग पोलीस विभागाच्या गाडीला देखील दगडफेकीचा फटका बसला आहे.

हेही वाचा 

Back to top button