Rapido Bike Taxi Pudhari
पुणे

Pune Rapido Bike Taxi: पुण्यात रॅपिडोची बाइक टॅक्सी सेवा बंद होणार? कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

वैध ॲग्रीगेटर परवान्याविना व्यवसाय सुरू; आरटीओकडून ॲप बंद करण्याची प्रक्रिया, दुचाकीमालकांनाही कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे शहरासह जिल्ह्यात बाइक टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या ‘रॅपिडो’ कंपनीकडे वैध ॲग्रीगेटर परवाना नसतानाही व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, कंपनीचे बाइक टॅक्सी ॲप बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी या ॲपचा वापर करू नये, तसेच दुचाकी मालकांनी आपली वाहने या सेवेसाठी नोंदवू नयेत, असे आवाहन पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १५ ऑक्टोबर रोजी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य, ॲग्रीगेटर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि ऑटोरिक्षा, टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती.

या बैठकीत ‘रॅपिडो’ची संचालक कंपनी मे. रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. हिला ई-बाइक टॅक्सीचा ॲग्रीगेटर परवाना मिळेपर्यंत पुणे जिल्ह्यातील बाइक टॅक्सी सेवा पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही कंपनीने सेवा सुरू ठेवल्याने १६ ऑक्टोबर रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकीमालकांनाही कारवाईचा इशारा

खासगी नोंदणी असलेल्या दुचाकींची ‘रॅपिडो’च्या बाइक टॅक्सी ॲपवर नोंदणी करू नये. अशा वाहनांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर होत असल्याचे तपासणीदरम्यान आढळल्यास संबंधित वाहनमालकांवर मोटार वाहन कायदा व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिला आहे.

रिक्षा व्यावसायिकांकडून धक्काबुक्की

बाईक टॅक्सीविरोधात आंदोलनात सहभागी झालेल्या रिक्षा संघटनांनी सोमवारी आंदोलनादरम्यान प्रवाशांना सुविधा पुरविणाऱ्या रिक्षाचालकांना धक्काबुक्की केली. काही ठिकाणी तर अशा चालकांना चोप देण्याच्या घटनाही घडल्या. ओला, उबेरद्वारे अशा सेवा घेणाऱ्या प्रवाशांचे त्यामुळे हाल झाले. तर, बाईक टॅक्सीसेवा पुरविणाऱ्यांनाही अडवून दमदाटी केल्याचे प्रकार समोर आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT