Arrested Pudhari
पुणे

Ranjhe Sagar Palve Case: रांझेतील सागर पालवे खूनप्रकरणी तिघांना अटक; विधीसंघर्षीत बालक ताब्यात

पिस्तुलातून गोळीबार व कोयत्याने वार करून तरुणाचा खून; तिन्ही आरोपींना २४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

खेड शिवापूर: रांझे (ता. भोर) येथे मध्यरात्री पिस्तुलातून गोळीबार करून तसेच कोयत्याने वार करत २८ वर्षीय सागर रामचंद्र पालवे यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना ६ सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणातील फरार आरोपींचा राजगड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी संयुक्तपणे तपास करून शोध घेत तीन आरोपींना अटक केली. यामध्ये एका विधीसंघर्षीत बालकाचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर पालवे हे नातेवाईक व साक्षीदारांसोबत गप्पा मारून घरी जाण्यासाठी रांझे येथील शांताराम हॉटेलमधून बाहेर पडले होते. या वेळी साई सप्लायर्स सिमेंट दुकानासमोर विनायक थोरात व त्याच्यासोबत आलेल्या अन्य चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी पिस्तुलातून गोळीबार केला तसेच धारदार कोयत्याने सागर यांच्या चेहरा, डोके, हात, डावा गुडघा व पोटावर वार केले. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. राजगड पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अहोरात्र तपास करत विविध ठिकाणी शोध घेतला. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढत सापळा रचून त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले.

दरम्यान, तपासात विनायक ऊर्फ दाद्या विजय थोरात (वय २१), सिद्धार्थ ऊर्फ बाबू अंकुश येमपुरे (वय २२, दोघेही रा. शिवापूर, ता. हवेली), सिद्धांत ऊर्फ बाबू संतोष जांभुळकर (वय २३, रा. रांजे, ता . भोर) यांचा सहभाग निष्पन्न झाला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.

तसेच, १७ वर्षे ६ महिन्यांच्या विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेऊन रिमांड होममध्ये ठेवण्यात आले आहे. अटक केलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता २४ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT