राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील देखभालीची माहिती घेणार: आयुक्त नवलकिशोर राम  Pudhari
पुणे

Rajiv Gandhi Zoo: राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील देखभालीची माहिती घेणार: आयुक्त नवलकिशोर राम

अहवाल आल्यावर मृत्यूचे कारण होणार स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील एकूण 16 चितळ जातीच्या हरणांचा मृत्यू झाला आहे. सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या असून, नागपूरच्या पथकाने तपासण्या केल्या आहेत. हरणांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला, हे अद्याप सांगता येणार नाही.

दोन दिवसांनंतर अहवाल आल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. उद्यान विभागात प्राण्यांची काळजी कशी घेतली जाते, याची माहिती घेणार आहे. जर येथील कर्मचार्‍यांची चूक असल्यास त्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. (Latest Pune News)

राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात 39 नर व 60 मादी असे एकूण 99 चितळ जातीची हरणे आहेत. 7 जुलै ते 12 जुलैदरम्यान कोणत्याही आजाराची पूर्वलक्षणे न दिसता यातील तब्बल 16 चितळांचा मृत्यू झाला आहे.

मृत प्राण्यांच्या शरीराचे अवयव व रक्ताचे नमुने तपासणीसाठी भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, बरैली येथील नॅशनल रेफरल सेंटर फॉर वाइल्ड लाईफ डिसीज मॉनिटरिंग अँड प्रीव्हेंशन आणि भुवनेश्वर येथील आयसीएआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूट अँड माऊथ डिसीज व भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सेक्युरिटी अ‍ॅनिमल डिसीज, विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, पुणे विभागीय वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, गोरेवाडा नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

हरणांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, याचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. उर्वरित हरणांची प्रकृती ठीक असल्याची माहिती राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव व महानगरपालिकेचे मुख्य उद्यान निरीक्षक डॉ. अशोक घोरपडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT