वाफगाव: राजगुरुनगर-वाफगाव ते शिरदाळे फाटा रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम करताना निघालेली माती व खडी रस्त्याच्या बाजूला पसरवली जात आहे. रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे प्रवासी व नागरिक हैराण झाले आहेत.
राजगुरूनगर-वाफगाव-शिरदाळेफाटा हा खेड, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम गेल्या आठ महिन्यांपासून सुरू आहे. हे काम संथगतीने होत आहे.
टप्प्याटप्प्याने एकएका भागाचे काम पूर्ण करणे आवश्यक असताना ठेकेदाराने प्रत्यक्षात वेगवेगळ्या भागांत पोटठेकेदार नेमल्याचे समजते. अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. त्यामुळे रस्त्यावर माती व खडी जमा झाली आहे. या रस्त्यावरून हायवा, एसटी, मोटारी जाताना मोठ्या प्रमाणात धूळ उडते. त्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी व नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यावर पाणी मारण्याबाबत संबंधित ठेकेदाराला वारंवार सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवासी व नागरिक हैराण झाले आहेत. धुळीमुळे रस्त्यावरील खडी दिसत नसल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले आहेत. रस्त्याची बारीक खडी अजूबाजूला पसरल्याने वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे.
या रस्त्याच्या कडेला दुतर्फा सामाजिक वनीकरनाच्या माध्यमातून झाडे लावण्यात आली होती. ती तोडण्यात आली आहेत. हा रस्ता मजबुत व रुंद करताना मुरूम टाकणे आवश्यक असताना त्या ठिकाणी माती भरली जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे रस्त्याच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी रस्ता खोदल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.