PDCC Bank Representative Election Pudhari
पुणे

PDCC Bank Representative Election: सिद्धेश्वर सोसायटीत मोहिते पाटील गटाची बाजी; सातकर गटाला राजकीय धक्का

पीडीसीसी बँक प्रतिनिधीपदी अमोल सांडभोर पाटील बिनविरोध; हिरामण सातकर यांना प्रतिनिधी निवडणुकीतून धक्का

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिनिधी निवडणुकीत बँकेचे संचालक तथा माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी बाजी मारली आहे. मोहिते पाटील यांचे खंदे समर्थक व सिद्धेश्वर सोसायटीचे उपाध्यक्ष अमोल वसंतराव सांडभोर पाटील यांची प्रतिनिधी म्हणुन बिनविरोध निवड झाली आहे.

राजगुरुनगर येथील ११० वर्षांची परंपरा असलेल्या सिद्धेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर माजी आमदार स्व आप्पासाहेब तथा साहेबराव सातकर गटाचे कायम वर्चस्व राहिले.मात्र शनिवारी (दि १९) झालेल्या प्रतिनिधी निवडीत मोहिते पाटील समर्थकांनी बाजी मारल्याने सातकर गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

निवड बैठकीत सोसायटीचे उपाध्यक्ष अमोल सांडभोर पाटील, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, माजी सभापती नवनाथ होले, सरपंच विजय थिगळे, बाळासाहेब जैद, भगवान मांजरे आणि सुंदराबाई वेहळे सभागृहात उपस्थित होते. निवडणूक अधिकारी तथा सचिव कुमार राळे यांनी कामकाज पाहिले. बैठकीला माजी सभापती हिरामण सातकर, खंडेराव थिगळे आणि सुनिता सातकर हे बैठकीस अनुपस्थित होते.

सहकार महर्षी व माजी आमदार कै. साहेबराव सातकर यांचे सुपुत्र हिरामण सातकर हे जिल्हा बँकेच्या 'अ' वर्ग गटातून पुन्हा पीडीसीसी बँकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात होते. बँकेच्या निवडणुकीत उतरण्यासाठी सिद्धेश्वर सोसायटीच्या अधिकृत प्रतिनिधी पदावर त्यांची निवड होणे अनिवार्य होते. मात्र, सोसायटीच्या संचालक मंडळात मोहिते पाटील गटाने अंतर्गत पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी करत आवश्यक संख्याबळ स्वतःच्या बाजूने वळवले आणि आपल्या कट्टर समर्थकांची प्रतिनिधी म्हणून निवड केली.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड तालुकाध्यक्ष,बाजार  समितीचे माजी सभापती व जिल्हा सहकारी बोर्डावर अध्यक्ष म्हणून कार्य केलेले हिरामण सातकर यांना स्वतःच्याच घरच्या सोसायटीतून पीडिसीसी बँकेला मतदार प्रतिनिधी म्हणून जाता न आल्याने खेड तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT