राजगुरुनगर: मुरूम उत्खननाची तक्रार केल्याच्या रागातून एकाला जीवे मारण्याचा प्रकार घडला. जीवे मारण्याच्या हेतुने त्याच्या व मित्रांच्या पार्किंग मधील चार गाड्यांवर हायवाने थेट धडक देऊन गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.तसेच त्याला कोयता, विळा व दगड दंडक्यांनी गंभीर मारहाण करण्यात आली.
खेड सिटी परिसरालगत असलेल्या रेटवडी, ता. खेड येथे बुधवारी (दि २०) रात्री साडे दहा वाजता घडलेल्या या मारहाणीच्या प्रकाराने परिसरात दहशत आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. सेझ परिसरातील खेड सिटी येथे कंपन्यांची विविध प्रकारची ठेकेदारी मिळवण्याची पार्श्वभूमी या गुंडगिरीला असल्याचे बोलले जात आहे. दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे दोन गटात जोरदार हाणा मारी झाली होती. प्रमोद रघुनाथ हिंगे (वय २८) रा. रेटवडी, सातारकावस्ती यांनी खेड पोलिसात तक्रार दिली आहे.अशोक कान्दू रेटवडे, दर्शन मच्छिंद्र काळे , संकेत कांताराम दुबे, प्रणव नवनाथ पवळे (सर्व रा. रेटवडी), प्रविण प्रकाश रामाणे (रा. दावडी, ता. खेड) सह इतर ३ अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेटवडी गावात एका हॉटेलच्या शेड व पार्किंगमध्ये घडलेल्या या घटनेत अमोल काळे यांना लाकडी दांडके, कोयता आणि विळ्याने डोक्यात, पाठीवर व पायावर वार करण्यात आले. आरोपींनी जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांची हायवा गाडी अमोल यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्नही केला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी प्रथम अमोल काळे यांना शिवीगाळ व दमदाटी केली.
त्यानंतर अशोक कान्दू रेटवडे व प्रविण प्रकाश रामाणे यांनी लाकडी दांडक्याने मारहाण सुरू केली. नंतर त्यांनी टाटा इंड्रा गाडीतून कोयता व विळा काढून अमोल काळे यांच्या डोक्यात वार केले. अमोल जेव्हा जमिनीवर पडला तेव्हा आरोपी अशोक रेटवडे याने वैभव वाबळे यांच्या टाटा हेरियर गाडीच्या बोनेटवर उभे राहून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत फिर्यादी प्रमोद हिंगे यांची स्विफ्ट गाडी (MH-14-KJ-3686एम एच १४ ) वैभव वाबळे यांची टाटा हेरियर (MH-14-MQ-8283) अमोल काळे यांची वेरणा गाडी (MH-14-KP-7577) किरण जानेश्वर पवार यांची आय-ट्वेन्टी गाडी (MH-14/3683) या सर्व गाड्यांना हायवा गाडीने (MH-14-HG-7070) ठोसे मारून नुकसान करण्यात आले.
तसेच दगडफेक करूनही गाड्यांचे नुकसान करण्यात आले.आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNSS) कलम १०९(१), १८९(२)(४), १९१(२)(३), ३५२, ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गोडगे यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ही घटना रेटवडी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण करणारी ठरली आहे. - फोटो - रेटवडी येथील नुकसानग्रस्त वाहने