कोंडीभाऊ पाचारणे
खेड : राजगुरुनगर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी (दि. 2) पार पडलेल्या मतदानात मतदारांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. एकूण 25 हजार 801 नोंदणीकृत मतदारांपैकी 68.87 टक्के मतदान झाले; म्हणजेच अंदाजे 17 हजार 770 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
दुसऱ्या दिवशी मतमोजणी 3 डिसेंबर रोजी अपेक्षित असताना नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे ती 21 डिसेंबरपर्यंत ढकलली गेली आहे. या विलंबामुळे राजकीय पक्षांमध्ये संशय आणि नाराजीचा सूर आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत कलह आणि महाविकास आघाडीची कमकुवत स्थिती, यामुळे निवडणुकीची चुरस वाढली होती. निकालानंतर स्थानिक महायुतीमधील नेत्यांमध्ये सत्तासंघर्ष तीव होण्याची शक्यता आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असली, तरी काही ठिकाणी किरकोळ तक्रारी नोंदविल्या गेल्या. पुणे जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांप्रमाणेच येथेही सकाळी 7.30 ते 9.30 या कालावधीत 13 टक्के मतदान झाले, तर दुपारी 2 वाजेपर्यंत 40 टक्के होते. नगरसेवकपदासाठी 3 जागा बिनविरोध झाल्या. नगराध्यक्षपदासाठी 11 अर्जांपैकी 5 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत महायुतीतील प्रमुख असलेले भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) एकमेकांविरुद्ध थेट लढले, ज्यामुळे येथे महायुती किंवा महाविकास आघाडीची कोणतीही एकजूट दिसली नाही. विशेष म्हणजे, उमेदवार न मिळाल्याने कोणत्याही पक्षाला नगरपरिषदेच्या निवडणुकीत पूर्ण जागा लढवता आल्या नाहीत.
मतमोजणी विलंबामुळे राजकीय वातावरण ढगाळ झाले आहे. नागपूर खंडपीठाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून 24 नगरपरिषदांच्या निवडणुकीसह एकूण मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली, ज्यामुळे ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त होत आहे. विरोधकांचा आरोप आहे की, हा विलंब सत्ताधाऱ्यांना ‘मतचोरी’साठी वेळ देत आहे, तर महायुती नेते म्हणतात की, न्यायालयीन आदेशांचे पालन आवश्यक आहे. या विलंबामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. कारण, 18-19 दिवस मतपेट्या गोदामात साठवून ठेवण्यात येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण प्रक्रियेत त्रुटी असल्याचे मान्य केले असले तरी, हा निर्णय लोकशाहीवर कलंक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
राजगुरुनगरसारख्या वाढत्या शहरीकरण असलेल्या भागात ही निवडणूक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. गेल्या काही वर्षांत रस्ते, पाणीपुरवठा आणि ड्रेनेजच्या समस्या वाढल्या असून, निकालानंतर नव्या नगराध्यक्षाला या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. स्थानिक व्यापारी आणि शेतकरी मतदारांनीही या निवडणुकीत सक्रिय भूमिका घेतली. एकंदरीत, मतदानानंतरची राजकीय स्थिती तणावपूर्ण असली तरी, 21 डिसेंबरचा निकाल हा महायुतीच्या भविष्यातील एकजुटीचा कसब सिद्ध करणारा ठरेल, असे बोलले जात आहे.
खेड तालुक्यातील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी उमेदवारांना ताकद दिली. नगराध्यक्षपद आणि 21 पैकी 13 जागांवर उमेदवार उभे केले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग््रेासच्या माध्यमातून माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अध्यक्षपदाच्या 1 सह 16 नगरसेवकपदासाठी उमेदवार उभे केले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेले अतुल देशमुख यांनी नगराध्यक्षपद आणि सर्वांत जास्त 16 ठिकाणी उमेदवार उभे केले. उबाठा सेनेचे तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांना केवळ अध्यक्षपदाचा उमेदवार देता आला. नगरसेवकपदासाठी पक्षाला एकही उमेदवार त्यांना देता आला नाही.