Election Alliance Pudhari
पुणे

Election Alliance: राजगुरुनगरमध्ये उमेदवारांचा तुटवडा; आघाड्या-जुळवाजुळवीचा राजकीय खेळ

नगरपरिषद निवडणुकीत प्रमुख पक्षांना पॅनल उभं करण्यात अडचण — कोण कोणासोबत? चर्चांना वेग

पुढारी वृत्तसेवा

खेड: खेड तालुक्यातील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना प्रमुख राजकीय पक्षांना पूर्ण पॅनल उभे करण्यात मोठी अडचण येत आहे. अशातच शहरात आघाड्या आणि जुळवाजुळवीचा खेळ सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 17 नोव्हेंबरपर्यंत असून, अर्ज माघारीची तारीख 25 नोव्हेंबर आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, निकाल 3 डिसेंबरला लागेल. नगराध्यक्षपदासह एकूण (21 नगसेवक) 22 जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पातळीवर ‌’शहर विकास आघाडी‌’ उभी राहण्याची जोरदार चर्चा आहे. ही आघाडी अपक्षांसह इतर पक्ष-गटांना सोबत घेऊन पूर्ण पॅनल उभे करणार असल्याच्या हालचाली जाणवत आहेत. गेल्या निवडणुकीतही अशा प्रकारची स्थानिक आघाडी यशस्वी झाली होती, त्यामुळे यंदाही तीच रणनीती अवलंबली जाण्याची शक्यता आहे.

राज्याच्या सत्तेत असलेले भाजप, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग््रेासला स्थानिक पातळीवर पुरेसे इच्छुक उमेदवार मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपचे तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे आणि अजित पवार गटाचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकत्र येऊन पॅनल उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग््रेास (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर तसेच काँग््रेासचे तालुकाध्यक्ष विजय डोळस हे राजगुरुनगर शहरातीलच असले तरी या दोन्ही पक्षांच्या विशेष हालचाली दिसत नाहीत. महाविकास आघाडीच्या बैठका होत असल्या तरी नगरपरिषद निवडणुकीसाठी अद्याप ठोस पॅनल उभे करण्यात अपयश आले आहे. पूर्वी भाजप, नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासचे असलेले अतुल देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केला आहे. त्यांनी अध्यक्षपदासह सर्व 21 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी दर्शवली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरल्याने शहरात प्रचंड राजकीय उलाढाल सुरू आहे. कोण कोणत्या आघाडीत सामील होणार? कोण स्वतंत्र लढणार? याबाबत रात्रंदिवस बैठका आणि फोनवर चर्चा सुरू आहेत. नगरपरिषदेवर सत्ता कोणाची राहणार? याकडे केवळ राजगुरुनगर शहरच नव्हे तर संपूर्ण खेड तालुक्याचे लक्ष लागले आहे. 2 डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत नेमकी कोणती आघाडी किंवा कोणता पक्ष बाजी मारणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. तोपर्यंत राजगुरुनगरचे राजकारण ढवळून निघणार हे मात्र निश्चित!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT