वेल्हे: तांदूळाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजगड तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाला कडक उन्हाचा फटका बसला आहे. ई-पीक पाहणीसाठी शनिवारी (दि. ३) आलेले राजगडचे तहसीलदार निवास ढाणे यांच्यासह अधिकारी पिकांची गंभीर स्थिती पाहून गहिवरले. राज्य शासनाने दुष्काळी तालुका म्हणून राजगडचा समावेश केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पककांची भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाने भात व इतर खरीप पिकांची पाहणी सुरू केली आहे.
ई-पीक पाहणीसाठी ग्राम महसूल अधिकारी, सहायकांची पथके नियुक्त केली आहेत. शनिवारी राजगड भागातील खांबवडी व इतर गावांत ई-पीक पाहणी तसेच पंचनामा करून राजगडचे तहसीलदार निवास ढाणे यांनी गंभीर स्थितीची माहिती घेतली. यावेळी मंडल अधिकारी राजकुमार यादव, ग्राम महसूल अधिकारी गजानन चोपडे, सहाय्यक तसेच शेतकरी उपस्थित होते. सर्वात गंभीर दुष्काळी स्थिती माळरानावरील भात, खरीप पिकांची झाली आहे. कडक उन्हामुळे भात खाचरे कोरडी ठणठणीत पडली आहेत. भात पिके वाळू लागली आहेत. तोरणा पासलीच्या अठरा गाव मावळात निम्म्याहून अधिक भात शेती करपून गेली आहे.
मेटपिलावरे, वाजेघर, आंबवणे, कोदवडी, तोरणा भागातील निवी, कोदापूर, कादवे, वरसगाव, निगडे मोसे, रुळे, आंबेगाव, शिरकोली, ओसाडे, रांजणे, खामगाव छत्र, कोंडगाव, पाबे, दापोडे, वेल्हे, मांगदरी, वांगणी, कोळवडी, घिसर, अंत्रोली आदी भागांत पावसाने दडी मारल्याने हातातोंडाशी आलेल्या भात पिकाला मोठा फटाका बसला आहे. पावसाअभावी उत्पन्नावर परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांवर उपासमार तसेच बेरोजगारीचे संकट उभे आहे. बहुतेक शेतकऱ्यांची उपजीविका भात पिकावर असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
ई-पीक पाहणी पुर्ण करण्याचे आव्हान
यंदा राजगड तालुक्यात ५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात व २ हजार हेक्टर क्षेत्रावर नाचणी व इतर खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात खरीप पिकांच्या लागवडीखाली ७३ हजार ४०० गट (७/१२) आहेत. त्यापैकी आजपर्यंत १६ हजार ७०० गटांत ई-पीक पाहणीची नोंदणी करण्यात आली आहे. सर्वच डोंगराळ, दुर्गम भाग असल्याने ई पीक पाहणी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे.
आता पाऊस पडला तरी वाळलेली पिके हाती लागणार नाही. तांदूळ मिळणार नाही तसेच जनावरांना खाण्यासाठी पेंढ्याचा चाराही मिळणार नाही.रमेश शिंदे, माजी सरपंच, केळद
दुष्काळी तालुका जाहीर झाल्याने राजगडच्या शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळण्यासाठी ७/१२ च्या उताऱ्यात चालू खरीप पिकांची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आपआपल्या शेतात जाऊन पिकांची ७/१२ उताऱ्यात नोंदणी करावी.निवास ढाणे, तहसीलदार, राजगड