खडकवासला: जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या राजगड किल्ल्याचा प्रमुख चोर दरवाजा मार्गालगतच्या 100 फूट लांबीच्या तटबंदीच्या दुरुस्ती व संवर्धनाचे काम पुरातत्व खात्याने सुरू केले आहे. मात्र, या कामाचा भार सध्या एकाच गवंड्यावर असल्याने काम अतिशय संथगतीने सुरू आहे.
दरम्यान, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी चोर दरवाजा मार्ग पुरातत्व खात्याने पर्यटकांना बंद केला आहे. दरम्यान, पुरातत्व खात्याने या कामावर जादा कारागीर, गवंडी तैनात केल्यास काम अधिक वेगाने पूर्ण होईल, अशी मागणी गड-किल्लेप्रेमींकडून होत आहे.
याबाबत स्थानिक शिवप्रेमी संघटनांनी पुरातत्व खात्याकडे चोर दरवाजा मार्गालगतच्या तटबंदीच्या कामावर जादा कारागीर गवंडी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. गडावर चढाईसाठी गुंजवणे दरवाजा व पाल खुर्द दरवाजा मार्गापेक्षा चोर दरवाजा मार्ग सोपा आहे. त्यामुळे या मार्गाने गडावर चढाई करणाऱ्या महिला, मुलांसह पर्यटकांची संख्या अधिक असते. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाल्यापासून राजगडावर येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांची संख्या वाढली आहे.