Rajgad Fort Pudhari
पुणे

Rajgad Fort: राजगडावर पर्यटकाचा चक्कर येऊन मृत्यू; गड-किल्ल्यांवरील वैद्यकीय सुविधांचा प्रश्न ऐरणीवर

पाली दरवाजाजवळ ३४ वर्षीय पर्यटक कोसळला; सीपीआर देऊनही प्राण वाचविण्यात अपयश, प्राथमिक उपचार केंद्र उभारण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या ३४ वर्षीय पर्यटकाचा पाली दरवाजाजवळ चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना दि. १० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास घडली. जिज्ञेश सदाशिव खंडाळकर (वय ३४, रा. फुरसुंगी, पुणे) असे मृत पर्यटकाचे नाव आहे.

तीव्र उन्हामुळे चक्कर आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे राजगडावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिज्ञेश खंडाळकर हे आपल्या मित्रांसह राजगड किल्ला पाहण्यासाठी आले होते. ते पाली दरवाजाजवळ असताना अचानक चक्कर येऊन पडले. त्यावेळी त्यांचे मित्र बालेकिल्ल्यावर पोहोचले होते.

घटनेची माहिती मिळताच पुरातत्त्व विभागाचे पहारेकरी दीपक पिलावरे, विशाल पिलावरे, महावितरणचे कर्मचारी शंकर रसाळ, चेतन चोरगे तसेच स्थानिक नागरिक आकाश जाधव, सुभाष जाधव आणि लहू यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिज्ञेश यांची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच उपस्थितांनी त्यांना तत्काळ सीपीआर (CPR) देऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर स्ट्रेचरच्या सहाय्याने त्यांना किल्ल्यावरून खाली आणण्याची व्यवस्था करण्यात आली.

१०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या खंडोबा माळ येथे बोलावण्यात आली. तेथून त्यांना पुढील उपचारांसाठी वेल्हे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी कुरणकर यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते हेही घटनास्थळी दाखल झाले.

गड-किल्ल्यांवर प्राथमिक उपचारांची सुविधा हवी

उन्हाची तीव्रता असताना गड-किल्ल्यांवर चढाई करताना पर्यटकांनी पुरेसे पाणी पिणे, वेळोवेळी विश्रांती घेणे आणि प्रकृती अस्वस्थ वाटल्यास तातडीने मदत घेणे आवश्यक आहे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनी केले.

राजगडासारख्या ऐतिहासिक किल्ल्यावर दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र, गडावर एखादी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदत पोहोचविण्यात अडचणी येतात. त्यामुळे किल्ल्याच्या पायथ्याशी रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यासह प्राथमिक उपचारांची सुविधा निर्माण करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT