वेल्हे: राजगड तालुक्यातील पाझर तलावांची कामे निकृष्ट दर्जाची करून कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. संततधार पावसामुळे भोर्डी व वरोती येथील निकृष्ट पाझर तलाव फुटण्याचा धोका आहे.
यामुळे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याची दखल घेऊन जलसंधारण विभागाच्या संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी स्थानिक शेतकर्यांसह जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते राजगड किल्ल्याच्या पायथ्याला 13 जुलैपासून बेमुदत उपोषण करणार आहेत. याबाबत संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाला निवेदन दिले आहे. (Latest Pune News)
भोर्डी येथील तलावाच्या कामासाठी चार कोटी 54 लाख रुपये मंजूर असताना या कामासाठी तब्बल नऊ वेळा वाढीव दायित्व निधी मंजूर करून 55 कोटी 60 लाख खर्च करण्यात आले. भोर्डी तलावाचे काम चार वर्षांपूर्वीच पूर्ण झाले असताना गेल्या दोन वर्षांत सहा वेळा काम न करता वाढीव दायित्व मंजूर करून 40 कोटी रुपयांचा अपहार करण्यात आल्याची तक्रार खुपसे पाटील यांनी केली आहे.
असाच गंभीर प्रकार राजगड तालुक्यातील वरोती येथील पाझर तलावाच्या कामात झाला आहे. या तलावाच्या कामासाठी 18 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र, एका वर्षातच या तलावाच्या कामासाठी 33 कोटी रुपयांची जादा बिले काढण्यात आली.
या तलावाच्या कामावर तब्बल 51 कोटी रुपयांचा खर्च करूनही तलाव अर्धवट अवस्थेत आहे. इको सेन्सिटिव्ह झोन असताना डोंगराची बेकायदा खोदाई करून त्याचे दगड तलावासाठी वापरण्यात आले. काळी माती न वापरता 90 किलोमीटर दूर अंतरावरून माती आणल्याचे दाखवून बिले काढण्यात आली असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.