मुंढवा: घोरपडी येथील जय हिंद चौकामध्ये रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी चौकामधील रस्त्याच्या बाजूला संरक्षक पत्रा लावण्यात आला आहे. पत्र्याच्या बाजूला असलेल्या दहा फूट रस्त्यावर दुहेरी वाहतूक होत असल्याने येथे वाहने अडकून पडत आहेत. त्यामुळे येथे दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
घोरपडी परिसरात लहान-मोठ्या तीन-चार शाळा आहेत. या शाळांमधील जाणारे विद्यार्थी आणि पालकांची परिसरातील रस्त्यावर वर्दळ असते. मात्र उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. (Latest Pune News)
जयहिंद चौकामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून घोरपडी बाजारच्या बाजूने साईबाबा मंदिर रेल्वेगेटकडून बी. टी. कवडे रस्त्याकडे जाणार्या वाहनांसाठी रेल्वे कॉलनीच्या बाजूने पर्यायी रस्ता करण्यात आला आहे.
मात्र, अनेक दुचाकी व चारचाकी वाहने येथून न जाता विरुद्ध बाजूने जयहिंद चौकामधून बी. टी. कवडे रस्त्याकडे जातात. त्यामुळे जयहिंद चौकामधील उड्डाणपुलाच्या बाजूच्या दहा फूट रस्त्यावर वाहने समोरासमोर येत असल्याने येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. मुंढवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे म्हणाले की, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्यात येतील.
घोरपडी परिसरातील अनेक वाहनचालक जय हिंद चौकामधील अरुंद रस्त्याने बी. टी. कवडे रस्त्याकडे जातात. उड्डाणपुलाचे काम होईपर्यंत या वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच साईबाबा मंदिर रेल्वेगेट येथून विरुद्ध बाजूने घोरपडी गावात येणारी वाहने बंद होणे आवश्यक आहे.
- बाळासाहेब मोडक, सामाजिक कार्यकर्ते, घोरपडी