Notice Pudhari
पुणे

Rajgad 11 Teachers Notice: अतिवृष्टीत गावात थांबण्याचे आदेश धुडकावले; राजगडमधील ११ शिक्षकांना नोटिसा

शाळेच्या पाहणीत शिक्षक गैरहजर आढळले; खुलासा न दिल्यास कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

वेल्हे: नियुक्तीस गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हजर न राहणाऱ्या ११ कामचुकार शिक्षकांना राजगड तालुका पंचायत समितीने नोटिसा बजावल्या आहेत. गेल्या आठवड्यात अतिवृष्टीने राजगड तालुक्यात थैमान घातले होते. रस्ते, शेती वाहून गेल्याने जनजीवन ठप्प पडले होते. त्यामुळे प्रशासनाने शाळांना सुटी दिली होती.

आपत्कालीन मदतीसाठी शिक्षकांना आपापल्या गावांत थांबवण्याचे आदेश दिले होते. शासकीय आदेशाला मुठमाती देत वेल्हे, आंबवणे, पानशेत भागातील अनेक शिक्षक गावातील शाळेत हजर राहिले नाही.

राजगड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी वेल्हे-नसरापूर रस्त्यावरील काही शाळांची पाहणी केली असता शिक्षक गायब असल्याचे गंभीर चित्र पुढे आले. राजगड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ म्हणाले की, मोजक्याच शाळांत तपासणी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गैरहजर असलेल्या ११ शिक्षकांना नोटिसा पाठविल्या आहेत.

त्यांच्यावर शासन निर्णयानुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. राजगड तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अजित पाटील म्हणाले की, गैरहजर शिक्षकांकडून खुलासे आले नाहीत. त्यामुळे अद्याप त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही.

नेमणुकीस असलेल्या गावात शिक्षक राहत नाहीत. असे असले तरी गावात राहत असल्याचे लेखी पत्र देऊन दरमहा ७० ते ९० हजार रुपयांचा पगार शिक्षक नियमितपणे घेतात. शिक्षण विभागाच्या भ्रष्ट कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. कामचुकार शिक्षकांमुळे स्वातंत्र्यानंतर देखील राजगड तालुक्यात शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे.
अमोल पडवळ, सरपंच, शिरकोली (ता. राजगड)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT