राहू: राहू (ता. दौंड) येथील थोरली विहीर परिसरात रविवारी (दि. २५) रात्री ९.३० वाजता डीजे साउंड सिस्टिमवर कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवत आरडाओरड आणि गोंधळ घातल्याचा प्रकार घडला. यवत पोलिसांनी गोंधळ थांबविण्याच्या वारंवार सूचना देऊनही संबंधितांनी उपद्रव सुरूच ठेवल्याने पोलिसांनी ३८ जणांवर गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा पांडुरंग महात्मे नेमणूक यांनी फिर्याद दिली. त्यानुसार समाधान ईश्वर गाढवे, आप्पा जगदाळे, संग्राम सोनवणे, विजय कुंभार, आदित्य शिंदे, सार्थक चव्हाण, ओम सोनवणे, शंभू रामभाऊ कुल, भाऊ गाढवे (सर्व रा. राहू, ता. दौंड), अथर्व पुणेकर (रा. मांजरी, ता. हवेली), कृष्णा कोळपे व मनोज लोनकर (रा. केडगाव, ता. दौंड) तसेच महेश तायगुडे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) आणि इतर २५ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार संतोष कदम करीत आहेत. सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण, आरडाओरड किंवा कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिला आहे.