आळेफाटा: चिल्हेवाडी बंदिस्त जलवाहिनीने आणण्यात आलेले पाणी जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील अवर्षणप्रवण गावांसाठी वरदान ठरणार आहे. या मध्यम प्रकल्पाचे उर्वरित कामही लवकरच पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
कोळवाडी (ता. जुन्नर) येथे चिल्हेवाडी बंदिस्त जलवाहिनी मध्यम प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पाणीपूजन सोहळा व उर्वरित कामांच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात मंत्री विखे पाटील बोलत होते. (latest pune news)
मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाणी निधी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रकल्प विशिष्ट कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या काळात कालवा व पोटचार्यांची दुरुस्ती, काही धरणांची उंची वाढविणे व गाळ काढणे या कामांना गती मिळणार आहे.
भविष्यात बंदनलिकेतून पाणी देण्याचा जलसंपदा विभागाचा प्रयत्न आहे. यामुळे पाणी बचत होऊन जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. आमदार शरद सोनवणे यांनी मागणी केलेल्या श्रीक्षेत्र ओझर या ठिकाणी येडगाव धरणात नौकानयन व तेथे संरक्षक भिंत बांधण्यासंदर्भात अधिकार्यांची लवकरच बैठक घेऊ.
आमदार शरद सोनवणे म्हणाले की, चिल्हेवाडी हे मध्यम प्रकल्पाचे धरण असून, या धरणाची साठवणक्षमता एक टीएमसी एवढी आहे. या धरणाच्या बंदिस्त जलवाहिनीच्या कामास 2010 मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यानंतर हे काम अंतिम टप्प्यात आले.
यामुळे जुन्नरच्या पूर्व भागातील 21 गावांना बंदिस्त नलिकेच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी देण्यात येणार आहे. त्यासाठी यामधील पूर्व भागातील 8 हजार हेक्टर जमिनी सिंचनाखाली येणार आहेत. तसेच पठार भागावरील आणे येथेही पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आशा बुचके म्हणाल्या, पिंपळगाव जोगा कालव्याच्या पोटचार्यांमध्ये जमिनी गेलेल्या शेतकर्यांना अद्याप मोबादला मिळाला नव्हता. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा प्रश्न उपस्थित केला. सध्या हा विषय अंतिम टप्प्यात असून, संबंधित शेतकर्यांना पैसे मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलजीवन योजनेमुळे घरोघरी पाणी उपलब्ध होत आहे. सूत्रसंचालन गणेश गुंजाळ यांनी केले.