पुणे: आयुष्यातून शेतकरी वडिलांचे छत्र हरपले... आईने शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले... शिक्षणाचे पंख मिळाल्यावर त्यांनी प्रगतीचे शिखर गाठायचे ठरवले... मेहनत केली अन् यशाला गवसणी घातली... दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले अन् ‘हम किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिले... ही कहाणी आहे आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुली दुर्गा क्षीरसागर आणि नियती इंगोले यांची. दोघींनीही दहावीच्या परीक्षेत यश प्राप्त केले असून, त्यांच्या या यशाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. (latest pune news)
अर्धापूर (जि. नांदेड) येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुली भोई प्रतिष्ठानच्या पुण्यजागर या प्रकल्पांतर्गत पुण्यामध्ये गेल्या सात वर्षांपासून शिक्षण घेत आहेत. त्यांना वडील नाहीत. आई शेतात मोलमजुरी करते. या मुलींनी शिक्षणाची वाट शोधली आणि आईच्या कष्टाचे चीज केले. या मुलींनी दहावीमध्ये मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचे भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले.
दुर्गा ज्ञानेश्वर क्षीरसागर हिने दहावीच्या परीक्षेत 86.00 टक्के गुण मिळवले आहेत. आपल्या या यशाबद्दल दुर्गा म्हणाली, मला परीक्षेत यश मिळाल्याचा खूप आनंद आहे. याचे श्रेय मला पाठिंबा देणार्या सर्वांना जाते. आईच्या आशीर्वादामुळे मी यश मिळवू शकले. मला आयपीएस अधिकारी व्हायचे आहे. त्या स्वप्नासाठी मी खूप प्रयत्न करणार आहे.
नियती प्रभाकर इंगोले हिने दहावीच्या परीक्षेत 77.00 टक्के गुण मिळवले आहेत. नियती म्हणाली, मी नांदेड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलगी. दहावीच्या परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली. अभ्यास केला. परीक्षेत यश मिळवल्याचा आनंद आहे. माझे यश पाहून कुटुंबीयही आनंदित झाले. मला पोलिस बनायचे आहे, बारावीनंतर त्यासाठी पोलिस अॅकॅडमीत प्रवेश घेऊन प्रयत्न करणार आहे.