खडकवासला : पानशेत व वरसगाव धरण खोऱ्यातील सह्याद्रीच्या दुर्गम डोंगराळ भागातील उच्चशिक्षित, शिक्षित कष्टकरी युवतींच्या सत्य कहाणीने पानशेतचे नागरिक भारावून गेले. आर्थिक हालाखी व जवळपास शिक्षणाची सोय नसल्याने शिक्षणासाठी पानशेतमधील रचना संस्थेच्या वसतिगृहात राहून धरण खोऱ्यातील युवतींनी दहावी, बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर खडतर संघर्ष करत सिंहगड रोड, पुण्यातील शिक्षण संस्था, महाविद्यालयात बी.सी.एस., बी.सी.ए, नर्सिंग आदींचे शिक्षण घेऊन या युवती स्वावलंबी झाल्या आहेत. खडतर संघर्षानंतर तीनशे गरीब युवतींच्या आयुष्याला जणू ‘रचना’त्मक पैलू पडल्याचे चित्र दिसून येत आहे. (Latest Pune News)
गेल्या 22 वर्षांत जवळपास तीनशेहून अधिक युवतींनी रचना संस्थेच्या वसतिगृहात राहून शालेय, माध्यमिक शिक्षण घेतले. नंतर खानापूर, वडगाव, धायरी, पुणे अशा ठिकाणी उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन तसेच विविध शाखांच्या पदवी, पदविकांचे शिक्षण घेतले.
घरची आर्थिक स्थिती बिकट असताना अठरापगड जातींच्या गोरगरीब युवतींनी शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाची कहाणी त्यांच्या मुखातून ऐकताना उपस्थित महिला, नागरिक, विद्यार्थ्यांच्या अंगावर शहारे उभे राहिले. दिवाळीनिमित्त रचना संस्थेच्या वतीने ‘कहाणी मावळ मुलखातील रणरागिणींच्या संघर्षाची’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या वेळी वसतिगृहाच्या समन्वयक कल्पना घुले, व्यवस्थापिका राजश्री जाधव, नक्षत्र मीन संस्थेचे सुरेश कुमार, अर्पण सरकार आदी उपस्थित होते.
धरण खोऱ्यातील खेडी, वाड्या, वस्त्यांवर राहणाऱ्या व शिक्षणाचा गंध नसलेल्या, गरीब कुटुंबांतून आलेल्या मुलींनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहून दाखवले आहे. कुटुंबाला आर्थिक हातभार लावला. डोंगर दऱ्या-खोऱ्यातील मुले-मुलींंच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांना शिक्षण मिळावे, यासाठी 2003 मध्ये पानशेतमध्ये वसतिगृह सुरू केले. त्यामुळे या मुला-मुलींना शिक्षण घेता आले.स्वाती चव्हाण, संचालिका, रचना संस्था
जर रचना संस्थेचे वसतिगृह नसते तर आमचे शिक्षण अर्धवट सोडून आमचे लवकर लग्न झाले असते. आम्हाला उच्च शिक्षण घेऊन चांगली नोकरी करता आली नसती.सोनाली ढेबे व अनिता ढेबे
आमच्या आयुष्याला चांगली कलाटणी मिळण्यात रचना संस्थेच्या वसतिगृहाचे बहुमोलाचे योगदान आहे. त्यामुळे अनेकजणी आज बी.सी.एस., बी.सी.ए., नर्सिंग, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग अशा विविध शाखांमधून शिक्षण घेत आहेत.धनश्री आखाडे
वसतिगृहामुळे उच्च शिक्षण घेऊन आम्ही कंपन्यात नोकरी, तसेच स्वतःचे उद्योग, व्यवसाय करत आहोत.हर्षदा पोळेकर